संगमनेरमध्ये खा. विखे, लोखंडे यांचे बॅनर फाडले

पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा केला दाखल
संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील घुलेवाडी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नवनिर्वाचित खा. डॉ. सुजय विखे व खा. सदाशिव लोखंडे यांच्या विजयाबद्दल लावलेले बॅनर सोमवारी (दि.27) मध्यरात्री अज्ञातांनी फाडले. याच्या निषेधार्थ आज भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी घुलेवाडी गाव बंद ठेवत नाशिक-पुणे महामार्गावर आंदोलन केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात बॅनर फाडण्याच्या प्रकार घडल्याने निवडणूक निकालानंतरही राजकीय संघर्ष सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शहरानजीक असलेल्या घुलेवाडीत नवनिर्वाचित खा. डॉ. सुजय विखे पाटील व खा. सदाशिव लोखंडे यांच्या विजयाबद्दल छायाचित्र असलेले बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी फाडले. या घटनेचा शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी निषेध केला. कार्यकर्त्यांनी घुलेवाडी गाव बंद ठेवत सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घुलेवाडी फाट्यावर नाशिक-पुणे महामार्ग रोखून धरत रास्तारोको आंदोलन केले. फलक फाडणाऱ्यांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, पंचायत समिती सदस्य अशोक सातुपते, भाजपचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, कैलास वाकचौरे, बाळासाहेब राऊत, रवी गिरी यांच्यासह शिवसेना-भाजप कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोषींवर कारवाईचे ठोस आश्‍वासन पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्या राजश्री वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आ. बाळासाहेब थोरात सर्वसमावेशक नेतृत्व असून, येथील शांतता ही सर्वांना अभिमान वाटावी अशी आहे. घुलेवाडी फाटा येथे लावलेले फलक फाटणे हे पंधरा ते वीस भाजपा-सेना कार्यकर्त्यांनी केलेले कृत्य असून, ही फक्त प्रसिद्धीसाठी केलेली स्टंटबाजी आहे.

भास्कर पानसरे , माजी सरपंच, घुलेवाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)