पुणे -1,199 सदनिकांच्या बांधकाम प्रस्तावाला मंजुरी

वडगांव खुर्द येथील पंतप्रधान आवास योजना

पुणे – पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी महापालिका हद्दीतील वडगाव खुर्द या ठिकाणी 1,199 सदनिकांचे बांधकाम करण्यासाठी 103 कोटी 95 लाख रुपयांच्या व्हेस्कॉन इंजिनिअर लिमिटेडच्या निविदेस स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली.

स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या सदनिकांसाठी केंद्र आणि राज्य शासनाचे अनुक्रमे दीड लाख आणि एक लाख रुपये अनुदान लाभार्थींना मिळणार आहे.

वडगाव खुर्द येथील आरक्षणाची जागा “टीडीआर’च्या मोबदल्यात ताब्यात घेतली आहे. हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करायचा आहे. त्यानंतर लाभार्थींनी अनुदानाशिवाय जी रक्कम भरायची आहे, त्यासाठी बॅंकेची प्रक्रिया करण्यात महापालिका समन्वयक म्हणून मदत करणार असल्याचे या प्रकल्पाचे प्रमुख राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

केंद्र सरकारने सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे ही महत्त्वकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पुणे शहरातील पात्र लाभार्थींना घरे देण्याचे पुणे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. या योजनेचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामधून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यात येत आहे. अल्प उत्पन्न गटातील सदनिका बांधण्यासाठी हडपसर, खराडी, वडगाव खुर्द या परिसरातील 8 ठिकाणी प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 6,264 परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यास मुख्य सभेने मान्यता दिली होती. हडपसर, खराडी भागातील प्रकल्पांना या पूर्वी स्थायी समितीने मान्यता दिली होती. आता वडगाव खुर्द येथील प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी यावर्षीच्या अंदाजपत्रकात 70 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here