थोरात कारखान्याच्या चारा छावणीत 400 जनावरे

संगमनेर – राज्याच्या अनेक भागात दुष्काळाचे संकट गडद होत आहे. एकीकडे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला असतानाच दुसरीकडे जनावरेदेखील चारा-पाण्यासाठी हंबरडा फोडू लागली आहेत. संकटात सापडलेल्या पशुधनाला आधार देण्यासाठी संगमनेरमध्ये जनावरांसाठी छावणी सुरू करण्यात आली. या छावणीत 400 च्यावर जनावरे दाखल झाली.

राज्याचे माजी मंत्री आणि संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ही छावणी सुरू करण्यात आली आहे. कारखान्याच्या वतीने सुरू केली जाणारी जिल्ह्यातील ही पहिलीच छावणी आहे. डोक्‍यावर सूर्य आग ओकत असताना जनावरांसाठी मात्र या छावणीत पुरेशा नैसर्गिक मोकळ्या हवेत अन्य सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. डेरेदार वृक्षाच्या दाटीत कारखान्याच्या पेपर मिलच्या यार्डामध्ये ही छावणी सुरू आहे. शासकीय निकषाप्रमाणे दिला जाणारा दर्जेदार चारा-पाण्याची व्यवस्था यामुळे शेतकरीदेखील आपले पशुधन समाधानाने छावणीत सोडताना दिसत आहे.

दोन वर्षांपूर्वी 2015-16 मध्येदेखील दुष्काळाची गंभीर स्थिती संगमनेरमध्ये निर्माण झाली होती. त्यावेळीदेखील अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या मदतीने तालुक्‍यातील तळेगाव येथे चार हजार जनावरांसाठी छावणी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला. याशिवाय प्रत्येक गाव, वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाणी योग्य रितीने पुरवले जाते की नाही, याचा देखील आढावा आमदार थोरात दररोज प्रशासनाकडून घेत होते. अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाला योग्य सूचना देताना जेथे शासकीय अटी लक्षात घेता टॅंकरने पाणी देणे शक्‍य नाही, अशा ठिकाणी राजहंस दूध संघाच्या वतीने टॅंकरने पाणी पुरवठा करून दुष्काळाची दाहकता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कारखान्याचे 350 आणि राजहंस दूध संघाचे 150 कर्मचारी गावोगावी जाऊन जनावरांना चारावाटप करत होते. यावर्षीदेखील पुन्हा अशीच स्थिती निर्माण होऊ लागल्याने आमदार थोरात यांनी याप्रश्‍नी लक्ष घातले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here