डोन्ट मॅरी द स्टॉक (भाग-२)

डोन्ट मॅरी द स्टॉक (भाग-१)

ROE म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच निव्वळ भागधारकांच्या भांडवलावर मिळालेला परतावा तर ROC म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल म्हणजेच कंपनीचा तिच्यावर लावलेल्या एकूण भांडवलावरील म्हणजेच भागधारकांचं भांडवल व इतर कर्ज पुरवठादार जसं की कर्जरोखे अथवा कंपनीनं घेतलेली इतर कर्ज रक्कम यांच्यामागं मिळालेला परतावा. मी स्वतः ह्या बाबतीत ठराविक टक्के न पाहता मागील ४-५ वर्षांतील सुसंबद्धता पाहणे पसंत करतो. कंपनीनं दिलेला परताव्याचा दर हा टिकून राहणं मला जास्त महत्वाचं वाटतं. आता पुस्तकी किंमत म्हणजे, ताळेबंदाच्या दायित्व बाजूस असलेले समभाग भांडवल (इक्विटी शेअर कॅपिटल) + रिझर्व्ह. म्हणजेच कंपनीच्या भागधारकांचा पैसा अधिक नफ्यामधून रिझर्व्हमध्ये हस्तांतरीत केलेले पैसे = पुस्तकी किंमत. या संख्येला एकूण शेअर्सच्या संख्येनं भागल्यास प्रति शेअर पुस्तकी किंमत येते व सध्याच्या भावास या पुस्तकी किमतीनं भागल्यास हे गुणोत्तर येतं. त्यामुळं हे गुणोत्तर जितकं कमी तितकं चांगलं, अगदी उणे असल्यास उत्तमच. याशिवाय, जर कंपनी उत्पादन क्षेत्रातील असेल तर कच्च्या मालावरील खर्च हा साधारणपणे एकूण उत्पन्नाच्या १/३ ते १/४ असल्यास उत्तम.

सध्याची बाजाराची परिस्थिती पाहता, खासकरून एनबीएफसी कंपन्यांची, हा सर्वांत महत्वाच्या निकषांपैकी एक निकष ठरतो, तो म्हणजे व्याज व्याप्ती गुणोत्तर (ICR), जे आपणांस कंपनीची घेतलेल्या कर्जावरील व्याज परत करण्याची क्षमता दाखवतं. म्हणून हे गुणोत्तर जितकं जास्त तितकं चांगलं. ह्यासाठी थोडं खोलवर जाऊयात. कंपनीची एकूण विक्री (वजा) उत्पादन खर्च = व्याज+करपूर्व नफा EBIT (वजा) व्याज = करपूर्व नफा (वजा) कर = करपश्चात नफा(PAT). त्यामुळं व्याज+करपूर्व नफा (ज्याला Operating Profit देखील म्हणतात) जितका अधिक तितकं हे गुणोत्तर अधिक. यातदेखील मागील कांही वर्षांचा आढावा घेणं चांगलं. म्हणजे एखाद्या कंपनीचा ४ वर्षांपूर्वीचा ICR उणे असून आजतागायत त्यात उत्तरोत्तर वाढ होऊन तो शेकड्यात गेला असल्यास ही बाब सकारात्मक ठरू शकते. तसंच अजून एक महत्त्वाचा निकष मी इथं नमूद करतोय तो म्हणजे, प्रवर्तकांनी गहाण ठेवलेल्या शेअर्सची टक्केवारी. अगदी ढोबळमानानं विचार केल्यास माझ्या मताप्रमाणं ही टक्केवारी १०-१५ टक्क्यांच्या पुढं नसावी. ह्या एका मुद्यावर रोज बारीक लक्ष ठेवण्याची विशेष गरज आहे. आता अगदी ऋणमुक्त (Debt Free) कंपनीचंच उदाहरण जरी घेतलं तरी या कंपनीचा भाव मागील एकाच वर्षात ५३% पडलाय, कंपनीचं नांव आहे टाटा इलेक्सी. सध्याच्या बाजारात हीच कथा प्रत्येक निकषांवर निवडलेल्या उत्तम कंपनीची आहे. त्यामुळं कोणत्याही निकषावर अवलंबून राहून उत्तम कंपनी निवडून त्यात गुंतवणूक करून निश्चिंत राहणं सध्या अवघड होऊन बसलंय.

नक्कीच वरील मुद्द्यांवरून पडत्या बाजारात व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगसाठी मदत मिळू शकते परंतु सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही उत्तम निवडलेल्या कंपनीत केलेली गुंतवणूक ही साधारणपणे १५ ते २० टक्के नफा मिळाल्यास काढून घेऊन ती मुद्दल दुसऱ्या चांगल्या कंपनीत तशाच प्रकारे गुंतवणं सध्या सोयीस्कर ठरतंय. एकूण गुंतवणुकीचे दहा-पंधरा भाग करून अशाप्रकारे १०-२० टक्के नफा कमावून गुंतवणूक घुसळत ठेवल्यास एकतर लाभांशांबरोबर नफ्याचं उत्पन्न मिळून भांडवल वृद्धी होत राहील, अर्थातच यामध्ये देखील योग्य वेळी लाभातून लोभात जाणं टाळून कोणत्याही भावनेस बळी न पडता वेळप्रसंगी तोटा सहन करावयाची तयारी ठेवून आपली मुद्दल राखून गुंतवणूक व्यवहार करणंच रास्त ठरेल.

सध्याची बाजाराची अवस्था पाहता असं सुचवावं वाटतं की Don’t Marry the stock ! याउलट, प्रसिद्ध गुंतवणूक गुरु वॉरेन बफे २००९ मधील आपल्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत म्हणतात, “योग्य व्यक्तीशी लग्न करा. मी त्याबद्दल गंभीर आहे. यामुळं आपल्या जीवनात अधिक फरक पडेल. हे आपल्या आकांक्षा आणि सर्व प्रकारच्या गोष्टी बदलेल.”

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)