डोन्ट मॅरी द स्टॉक (भाग-१)

पवित्र बायबलमधील नीतिसूत्रें या पुस्तकात सद्गुणी पत्नीविषयी खूप मौल्यवान वचने आहेत व अशी स्त्री पत्नी म्हणून परमेश्वराच्या दयेनेच लाभते असं देवाचं वचन आहे. खरंच, लग्न ही आयुष्यातील सर्वांत महत्वाची गोष्ट आहे आणि त्याहीपेक्षा अनुरूप जोडीदार मिळणं. आता नाही म्हणायला बरेच जण नंतर सूर जुळवतात परंतु सुरुवातीला उत्तम जोडीदार निवडण्यासाठी (बरेच) काही मूलभूत निकष हे दोन्ही बाजूंनी अपेक्षित असतात जसं की, रंग, रूप, वयातील फरक, घराणं, सवयी, उत्पन्न, इ. मुलीच्या बाबतीत – गोरी, घर सांभाळणारी, पाककलेत उत्तम, सुशिक्षित, कमावती, एखादी कला अवगत असणारी, एकुलती एक असेल तर उत्तमच. तर मुलाच्या बाबतीत – देखणा, उच्चशिक्षित, उच्चपदाधिकारी, शहरात स्वतःचं घर असणारा, जबाबदारी नसणारा, कोणतेही व्यसन नसणारा, परदेशात स्थायिक असेल तर उत्तमच ! परंतु अनेक अनुभव असेही येतात की अगदी निवडून केलेल्या जोडीदाराबरोबर देखील संसार हवा तसा होताना दिसत नाही परंतु कांही जोडपी ही उत्तम नांदताना दिसतात ज्यांचं लग्न कोणत्याही निकषांवर जमावलेलं नसतं. आणि म्हणूनच म्हटलं जातं की, जोड्या या स्वर्गातच जुळवलेल्या असतात ! अगदी असंच आहे गुंतवणूकीचं देखील. अनेकांना वाटतं की गुंतवणूक हे शास्त्र आहे परंतु माझं मात्र मत आहे की गुंतवणूक हे नुसतं शास्त्र नसून ती एक कला देखील आहे, आणि अर्थातच त्याला विद्येची व ज्ञानाची जोड ही हवीच.

ज्याप्रमाणं लग्नासाठी एक जोडीदार शोधताना नाकी नऊ येतात, तसंच काहीसं सूज्ञ गुंतवणुकीसाठी चांगल्या कंपन्या निवडताना कोणते निकष लावू व कोणते नको असं होऊन जातं. अनेकवेळा आपण अनेक निकषांवर अभ्यासपूर्वक निवडलेल्या एकाच कंपनीवर आपली संपूर्ण पूंजी कधीच का लावत नाही ? आत्मविश्वासाचा अभाव ? का स्वतःवरील अविश्वास ? अनेक वेळा ऐकण्यात येतं की शेअर बाजारातील गुंतवणूक ही दीर्घ मुदतीसाठीच असावी, याउलट अनेक उत्तम अशा, निवडलेल्या कंपन्या गाळात गेलेल्या आपण पाहतोय. अगदी ताजी उदाहरणंच द्यायची तर येसबँक, रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स कॅपिटल. त्याचप्रमाणे अगदी ब्लूचिप कंपन्यांच्या भावाचे देखील सध्या १२ वाजलेले आहेत, यांमध्ये टाटामोटर्स (७३%), मारुति (४१%), पीएनबी (७३%), भेल (८३%), ओएनजीसी (५४%), वेदांता (६७%), सनफार्मा (६४%), येसबँक (७८%), झी टेली (४१%) अशा दिग्गज कंपन्या आहेत ज्यांचे भाव त्यांच्या उच्चांकापासून आज ८३ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. अशा लार्जकॅप कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे हे हाल आहेत, मिडकॅप व स्मॉलकॅप कंपन्यांचे तर विचारूच नका. मग आता प्रश्न पडतो की गुंतवणूक नक्की कोणत्या कंपन्यांमध्ये करावी ? त्यासाठी काय निकष लावले पाहिजेत कारण आज उत्तम समजल्या जाणाऱ्या कंपनीचा बाजार उद्या कोणत्या कारणावरून उठेल याचा नेम नाही.

डोन्ट मॅरी द स्टॉक (भाग-२)

उत्तम कंपन्यांची त्यांच्या मूलभूत विश्लेषणांनुसार निवड करताना कोणताही विश्लेषक पुढील मूलभूत गोष्टी मुख्यत्वे तपासून पाहतो, त्या म्हणजे कंपनीचा PE रेश्यो, प्रति शेअर अर्थार्जन म्हणजेच EPS, ROE, ROC, शेअरचा सध्याचा भाव व पुस्तकी किंमत यांचं गुणोत्तर (P/BV), इ. पीई रेश्यो हा जितका कमी तितकं चांगलं कारण कंपनीच्या एक रुपया कमाईच्या मागं आपण त्या कंपनीच्या शेअर्सना तितका भाव देत असतो. परंतु इथं फक्त कमी पीई रेश्यो ध्यानात न घेता त्या क्षेत्राचा पीई रेश्यो किती आहे हे देखील विचारात घेऊन त्यापेक्षा कमी पीई रेश्यो असणारी कंपनी उजवी ठरावी. अगदी याउलट म्हणजे EPS. जितकं प्रति शेअर अर्थार्जन जास्त तितकं चांगलं.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)