शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय गप्प बसणार नाही- आदित्य ठाकरे

संगमनेर: जनतेच्या अनेक प्रश्‍नावर आजपर्यंत शिवसेना संघर्ष करत आली आहे. पुढेही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा विश्‍वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला.

आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे संगमनेर तालुक्‍यात ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले. घारगाव येथे आदित्यने शेतात जाऊन ज्वारीची पेरणी ही केली. आगामी निवडणुकीत राज्यात पुन्हा भगवाच फडकणार, असा विश्‍वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

जळगावच्या पाचोरा येथून सुरू झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा संगमनेरमध्ये रविवारी चौथा दिवस होता. यात्रेने आज अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केला. संगमनेर शहर, चंदनापुरी आदी भागातील शिवसैनिकांच्या भेटी घेऊन ते सायंकाळी साडेसहा वाजता घारगाव येथे आले तेथे शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांच्या दणदणीत सभेला प्रचंड गर्दी उसळली होती. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, युवा संपर्कप्रमुख रणजीत कदम आदींसह तालुक्‍यातील शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, मी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही जनआशीर्वाद यात्रा काढली नाही, तर शेतकऱ्यांना भेटून त्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही यात्रा काढली आहे. ही जनआशीर्वाद यात्रा नसून तीर्थयात्रा आहे. शिवसैनिक हा निवडणुकीतच नव्हे तर सतत जनसेवेसाठी कार्यरत असतो. 80 टक्के समाजकारण, वीस टक्के राजकारण या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसारच शिवसेनेचे कार्य सुरू आहे. यापुढेही ते असेच सुरू राहील.

लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मते दिली त्यांचे आभार मानण्यासाठी, ज्यांनी मते दिली नाहीत त्यांची मने जिंकण्यासाठी सर्वांचे आशीर्वाद व खंबीर साथ मिळविण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार आहे. जनतेचे न्याय, हक्क मिळवून देणारे सरकार स्थापण्यासाठी ही यात्रा आहे. एक नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न घेऊन ही जनआशीर्वाद यात्रा निघालेली आहे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. दुष्काळमुक्त, बेरोजगारीमुक्त, प्रदूषणमुक्त असा सुजलाम्‌ सुफलाम्‌ महाराष्ट्र घडविण्यासाठी आशीर्वाद द्या, साथ द्या, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.