खासगी ट्रॅव्हल्सला ब्रेक असतो का?

आज जरा प्रवास करतांना आलेला अनुभव सांगायचा आहे. मूळची नागपूरची जरी असली तरी गेल्या चार-पाच वर्षांपासून शिक्षण आणि नंतर जॉबच्या निमित्ताने मुक्काम पुण्यातच आहे. मुक्काम पुण्यात असला तरी फॅमिली मात्र नागपुरातच असल्याने अधून-मधून जोडून सुट्टीचा योग आल्यास थेट घर गाठते. जवळपास 16 तासांचा हा दीर्घ पल्ल्याचा प्रवास मी शक्‍यतो रेल्वेनेच करते मात्र कधी रेल्वेचे तिकीट बुक न झाल्यास खासगी ट्रॅव्हल्स खेरीज पर्याय उरत नाही. खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील रेल्वेप्रमाणेच मोठी असली तरी खासगी ट्रॅव्हल्सच्या उपलब्धतेमुळे ट्रॅव्हलचे तिकिटबुक होण्यास फारशी अडचण येत नाही. सीझनच्या काळात देखील अगदी एक-दोन तासांपूर्वी तिकीट बुक केले तरी चढ्या भावाने का होईना पण तिकीट मिळून जाते.

प्रवास हा मानवाला परिपूर्ण बनवणारा अनुभव असतो असं म्हंटल जातं. मात्र पुण्याहून नागपूरला जाताना मला आलेल्या अनुभवाने मला परिपूर्ण बनवले की नाही याबाबत खात्री नाही परंतु या प्रवासानंतर मी गोष्ट मनाशी पक्की ठरवली आणि ते आजतागायत पाळत देखील आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या अखेरीस कॉलेजच्या फायनल इयरच्या परीक्षा संपल्याने आता महिनाभर निवांत घरी जावे असा विचार केला. परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या आणि जरा जास्तच होमसिक वाटत असल्याने कोणत्याही प्रिप्लॅन शिवाय घराकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला. आता कोणत्याही प्रिप्लॅन शिवाय नागपूरला जायचं म्हणजे साहजिकच रेल्वेचा पर्याय तर बाद ठरला होता आणि त्यामुळे ट्रॅव्हल्स हा एकमेव पर्याय डोळ्यापुढे होता. थोडा विचार केला खरा पण घरी जाण्याची ओढ जास्त असल्याने मिळेल त्या ट्रॅव्हल्सचे तिकीट बुक केले आणि थेट पुण्यातलं सर्वपरिचित खासगी ट्रॅव्हल्स पार्किंग गाठलं. खरतर नावाला ट्रॅव्हल्सचे पार्किंग असलेल्या या ठिकाणी जाताच सर्वत्र उडत असलेली धूळ, साधी बसायला देखील नसलेली जागा हे सर्व पाहून आपला निर्णय गंडलाय याबाबत प्रचिती आली होती. मात्र पेशन्स न गमावता मी शांत बसून राहिले आणि शेवटी तासभर उशिराने का होईना पण ट्रॅव्हल्स आली आणि प्रवास सुरु झाला. ट्रॅव्हल्समध्ये माझा बाजूच्या सीटवर नागपुरी मुलगी असल्यामुळे चांगल्याच गप्पा रंगल्या.

आम्हा दोघींनाही आता वॉशरूमला जायचं होतं मात्र बराच उशीर होऊन देखील गाडी काही थांबत नव्हती. शेवटी मीच पुढाकार घेत ड्रायव्हरकडे जाऊन गाडी थांबवण्यासाठी विनंती केली मात्र बहुदा आज त्याचा गाडी थांबवण्याचा इरादा नव्हता. मी त्याला “भैय्या वॉशरूमसाठी गाडी थांबवा” अशी विनंती केली मात्र त्यानं त्यावर केवळ ह्म्‌मम अशी प्रतिक्रिया देत मला सपशेल इग्नोर केलं.

ओशाळलेल्या चेहऱ्याने मी माझ्या जागेवर पुन्हा येऊन बसले मात्र बराच वेळ गेला तरी गाडी काही थांबण्याचं नाव घेत नव्हती. आता ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याचा निर्णय घेतल्याबाबत पश्‍चाताप होत होता. शेवट ड्रायव्हरने कृपादृष्टी दाखवत गाडी एका ढाब्यावर थांबवली. मी आणि माझ्या प्रवासी मैत्रिणीने थेट वॉशरूम गाठले मात्र ते अत्यंत अस्वच्छ होत मात्र नाइलाज होता. परत वॉशरूमला जावे लागू नये म्हणून दोन घासाच जेवण आणि घोटभरच पाणी पीत आम्ही परत ट्रॅव्हल्समध्ये जाऊन बसलो, ड्रायव्हरने गाडी सुरु करण्यापूर्वीच “आधीच उशीर झाला असल्यानं आता गाडी कुठंच थांबणार नाही” असा फतवा काढला. मी मात्र उरलेला प्रवास आपण ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याचा निर्णय का घेतला या बाबत स्वतःलाच कोसत बसले.

– प्रीती फुलबांधे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)