बारामती: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबीयांची चिंता करु नये. त्यासाठी आम्ही भाऊ-बहिण सक्षम आहोत. तुम्ही देशाचं बघा! पक्षाबाबत विचार करायला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते खमके आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मोदी यांना लगावला.
सुप्रिया सुळे यांनी आज बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं व मित्र पक्ष आघाडीच्या उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर नरपतगिरी चौक येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते.
राज्यातील लक्षवेधी लढत असलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुप्रिया सुळे यांनी कौन्सिल हॉलमध्ये आघाडीकडून अर्ज भरला. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. तसेच सुप्रिया सुळेयांचे पती सदानंद सुळे, मुलगी रेवती आणि बहीण नीता पाटील हे सुद्धा हजर होते.