कर्नाटक विधानसभा बरखास्तीची मागणी

जेडीएस-कॉंग्रेसमधील मतभेद विकोपाला गेल्याचे संकेत

बंगळूर – कर्नाटकमधील सत्तारूढ आघाडीचा घटक असणाऱ्या जेडीएसच्या एका ज्येष्ठ नेत्याने शनिवारी थेट विधानसभा बरखास्तीची मागणी केली. त्यामुळे जेडीएसचे मित्रपक्ष कॉंग्रेसबरोबरचे मतभेद विकोपाला गेल्याचे संकेत मिळत आहेत.

कॉंग्रेस आणि जेडीएसमध्ये झालेल्या सत्तावाटपाच्या समझोत्यानुसार कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद जेडीएसकडे गेले. काही दिवस दोन्ही पक्षांत चाललेल्या सुरळित राजकीय संसाराला मागील काही दिवसांपासून तडे जाऊ लागले आहेत. तशातच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून पुढे केली जाऊ लागली आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि जेडीएसमधील धुसफूस वाढीला लागल्याचे चित्र आहे. त्यातून सत्तारूढ आघाडीतील मतभेदांमुळे वैतागलेले जेडीएसचे नेते बसवराज होराट्टी यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला.

दोन्ही पक्षांनी आघाडी धर्म पाळून पाच वर्षे सरकार चालवण्याचा निर्णय सहमतीने घेतला. ते सोडून सिद्धरामय्या यांचे नाव पुढे करण्याचे कारण काय? त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होत आहे. सत्तारूढ आघाडीतील मतभेदांचा लाभ भाजप उठवू शकतो. मित्रपक्षांनी स्पष्ट निर्णय घ्यावा. एकतर सरकार चालवावे किंवा विधानसभा बरखास्त करावी, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी सबुरीचे धोरण स्वीकारत कॉंग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांना जाहीरपणे वादग्रस्त वक्तव्ये करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. केंद्रात बिगरभाजप सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांना धक्का बसेल अशी कृती करू नका, असे त्यांनी म्हटले. सत्तारूढ आघाडीतील धुसफूस पाहून भाजपकडून कर्नाटक सरकार फार काळ टिकणार नाही, असे भाकीत आधीपासूनच केले जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)