भामा-आसखेड योजना : पाणबुड्यांच्या मदतीने होणार काम
पाणी साठण्यासाठी चॅनलही तयार करावा लागणार
पुणे – शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भामा-आसखेड योजनेच्या शेवटच्या टप्प्यात जॅकवेलच्या कामासाठी नियंत्रित भूसुरूंगाचे स्फोट केले जाणार आहे. जॅकवेलमधून ज्या ठिकाणी पाणी उपसा केला जाणार आहे, त्या ठिकाणी सुमारे 150 मीटर खोल चॅनेलिंग करायचे असल्याने हे स्फोट केले जाणार असून त्यासाठी पाणबुड्यांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळेच ही योजना शेवटच्या टप्प्यात असली, तरी या कामासाठी सहा महिने लागणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
भामा-आसखेड येथे ज्या ठिकाणी जॅकवेल बसविला जाणार आहे, त्या ठिकाणी आठ पाण्याचे पंप असणार आहेत. या पंपाद्वारे पाणी उचलण्यासाठी महापालिकेस 150 मीटर खोल चॅनलिंग करावे लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी नियंत्रित भूसुरूंग स्फोट करण्याशिवाय पर्याय नाही.
याशिवाय, पावसाळ्यात धरणातील पाण्याची पातळी वाढत असल्याने त्यात हे स्फोट करणे शक्य नसल्याने या कामासाठी ठेकेदाराकडून पाणबुड्यांचा वापर केला जाणार आहे. मात्र, हे काम अतिशय किचकट असल्याने तसेच स्फोट केल्यानंतर पुन्हा पाण्याखालील राडारोडा वर काढून पाणी साठण्यासाठी चॅनल करावा लागणार असल्याने त्यास मोठा कालावधी लागतो. ही बाब लक्षात घेऊन पुढील सहा महिन्यांत हे ब्लस्टिंग तसेच चॅनेलिंगचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. शेवटच्या टप्प्यात 1,700 मिमी व्यासाच्या सुमारे 1 जलवाहिनीचे तसेच 1,600 मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे सुमारे 600 मीटरचे कामही तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.