मालेगाव : मालेगावमध्ये दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात 36 रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर मालेगावच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, 15 एप्रिल सकाळी 7 वाजल्यापासून 30 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असेल. त्याचबरोबर 15 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीत पाच दिवस बॅंकाही बंद ठेवण्यात येणार आहेत.
या संचारबंदी आदेशानुसार, मालेगाव शहरात भादंवि कलम 144 (1) (3) अन्वये कोणत्याही व्यक्तीला रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर, गल्लोगल्ली संचार, वाहतूक, विनाकारण फिरणे, उभे राहणे, एकाच ठिकाणी रेंगाळून राहणे अशा सर्व प्रकारच्या कृत्यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच महापालिका आयुक्तांनी नियंत्रित क्षेत्र म्हणून प्रतिबंधीत केलेले भाग सोडून उर्वरित भागांतील मेडिकल्स, रुग्णालये, दूध व चारा पुरवठा करणारे विक्रेते, घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सी या सेवांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
दरम्यान, शहरातील जे भाग महापालिकेने करोना हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहेत त्यातील प्रतिबंधित क्षेत्र पूर्णपणे सील करण्यात आले आहेत. तसेच बाहेरच्या बफर झोनमध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे मालेगाव पूर्व आणि बाकी मालेगावशी बाहेरचा संपर्क तोडण्यात आला आहे.