बीजिंग/ वुहान- चीनमधील करोना बाधितांची संख्या झपाट्याने कमी व्हायला लागली आहे. त्यामुळे वुहानमध्ये उभारलेली तात्पुरती रुग्णालये आता बंद करायल सुरुवात झाली आहे. यापैकी सर्वात मोठे तात्पुरते रुग्णालय आता बंद करण्यात आले आहे. हे रुग्णालय केवळ 10 दिवसांमध्ये उभारण्यात आले आहे. या रुग्णालयात कामाला असलेले हजारो वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देशभरातून या ठिकाणी वैद्यकीय सेवांसाठी आणण्यात आले होते. मात्र आता हे कर्मचारीही आता वुहान सोडून आपापल्या गावाला परतत आहेत.
हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या वुहान प्रांतातील लिशेन्शान हॉस्पिटलने आता रुग्णसेवा करणे थांबवले आहे. एकूण दोन रुग्णालयांमध्ये 1 हजार रुग्णांवर उपचारांची सुविधा करण्यात आली होती. त्यापैकी लिशेन्शान हे एक होते. या दोन मोठ्या रुग्णालयांव्यतिरिक्त चीनमध्ये क्वारंटाईन झालेल्या संशयित रुग्णांसाठी 14 अतिरिक्त आरोग्य केंद्रेही उभारण्यात आली होती. आता हुबेई प्रांतात पाठवलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची खेरची तुकडीही वुहान सोडून बाहेर पडली आहे, असे शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
चीनने हुबेईमधील रुग्णालयात 42 हजार वैद्यकीय कर्मचारी तैनात केले होते. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी 23 जानेवारीला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि 8 एप्रिलला येथील लॉकडाऊन उठवण्यात आला होता. लॉकडाऊनदरम्यान सुमारे 3 हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोना विषाणूचा संसर्ग झाला होता.