मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला; पिकांची नासाडी करत निळवंडे कालव्यांच्या कामास प्रारंभ

अकोले: मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिलेला शब्द फिरवला. दुसऱ्याच दिवशी उभ्या पिकांची नासाडी करत निळवंडे कालव्याच्या खोदाई कामाला प्रशासनाकडून प्रारंभ करण्यात आला आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवण्याची कृती केली, अशी भावना कालवेग्रस्त शेतकऱ्यांत पसरली असून, तालुक्‍यात तणावाचे वातावरण आहे.

मंत्रालयात बुधवारी (दि. 11) झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोले तालुक्‍याच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले व निळवंडे कालवे हे खोदाईचे काम विना पोलीस बंदोबस्तात करण्यासाठी अकोले तालुक्‍यातील कार्यकर्त्यांना आवाहन केले. परंतु आपला शब्द फिरवून मुख्यमंत्र्यांनी आज आपला नेमका रोख शेतकरी, सामान्य जनता की राजकारण? यांच्याकडे ठेवला, याबाबत चर्चा सुरू आहे. उभी असणारी पिके काढून सुमारे तीन किलोमीटरची आज युद्धपातळीवर खोदाई करून अकोले तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळले.
अकरा जेसीबी, तीन पोकलेन मशिन आणि सर्व उपस्थित अधिकारी यांच्या देखत या यंत्रांनी तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये आलेले उभे उसाचे पीक, भुईमूग, कोथिंबीर व अन्य उन्हाळी पिकांना उपसून फेकून दिले. उभ्या पिकातलं हे नुकसान पाहून मालकांनी आपल्या डोळ्यांची आसवे उरावर दगड ठेवून दडवली. कारण एवढा मोठा फौजफाटा पाहून त्यांचा ऊर दडपून गेल्याची भावना कार्यकर्त्यांनी माहिती देताना व्यक्त केली.

कालच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी अकोले तालुक्‍याच्या विविध मागण्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. कालवे खोदण्याचे काम सुरू करू द्या. अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका सरकारवर येईल, अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. मात्र त्यास त्यांनी हरताळ फासला, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

या सर्व प्रकारामुळे तणावाचे वातावरण जरूर राहिले. परंतु महसूल यंत्रणेचे प्रमुख, जलसंपदाचे प्रमुख आणि त्याला जोडून राक्षसी कामाचा उरक असणारी मशीन यामुळे पुढे येऊन विरोध करणे शक्‍य झाले नाही. आणि या धामधुमी मध्ये प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार मुकेश कांबळे, त्याचबरोबर जलसंपदाचे कार्यकारी अभियंता शिंगाडे, त्याचबरोबर कालवे कार्यकारी अभियंता, पोलीस उप अधीक्षक अशोकराव थोरात, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आदींनी आपले काम चोख बजावले.

जलविद्युत निर्मितीचा बोगदा ते तीन किलोमीटरचे अंतर जवळपास खोंडवस्ती पर्यंत आजच्या आज पूर्ण केल्याने शासनाने आपले चातुर्य दाखवून काम पूर्ण केले. पण सूडाची भावना प्रकल्पग्रस्तांमध्ये शिरुन अस्वस्थतेची भावना पसरली आहे. यामुळे पुढील काम जर अशाच पद्धतीने झाले, तर या नाराजीचा डोंब उसळल्याशिवाय राहणार नाही आणि या कालवे खोदाईच्या कामाला रक्तरंजित लढाईचे स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे एकूण चित्र आज या कामाला भेट दिली असता दिसून आले.


अडीचशे पोलिसांचा बंदोबस्त

आज जवळपास अडीचशे पोलीस, त्यांच्यावर नियंत्रण करण्यासाठी एक पोलीस उपाधीक्षक, एक पोलीस निरीक्षक, चार पीएसआय असा मोठा फौजफाटा धरणाच्या पूर्व बाजूला म्हणजेच विद्युतगृह बोगद्याच्या जवळ पास उभा केला होता. त्यामुळे निंब्रळ गावाला आज लष्करी छावणीचे स्वरूप आले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)