उत्तरप्रदेशात सोनभद्र येथे दहा अदिवासींच्या हत्येचे प्रकरण

उत्तरप्रदेत प्रियांका गांधी स्थानबद्ध : बेकायदा अटक केल्याचा कॉंग्रेसचा दावा

लखनौ/ दिल्ली- उत्तरप्रदेशात सोनभद्र येथे गौंड अदिवासी समाजाच्या दहा जणांची जमीनीच्या वादातून गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रकार घडल्यानंतर त्या ठिकाणी भेट देण्यासाठी निघालेल्या कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पोलिसांनी तेथे जाण्यापासून रोखले. तथापी प्रियांका गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी तेथे या कृत्याच्या विरोधात रस्त्यावरच धरणे धरल्यानंतर त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध करून जवळच्याच एका गेस्ट हाऊस मध्ये नेले. दरम्यान प्रियांका गांधी यांना बेकायदेशीररित्या अटक करण्यात आल्याचा दावा कॉंग्रेसने केला असून उत्तरप्रदेश सरकारच्या या लोकशाही विरोधी कृत्याचा त्यांनी निषेध केला आहे.

दरम्यान या प्रकरणी राज्य सरकार कठोर उपाययोजना करीत असून आत्ता पर्यंत प्रांत अधिकाऱ्यांसह एकूण चार सरकारी अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात आल्याचा दावा योगी अदित्यनाथ सरकारने केला आहे. गावचा सरपंच आणि त्याच्या समर्थकांनी या हत्या केल्याचा आरोप आहे. या हत्येच्या आरोपावरून पोलिसांनी गावचा सरपंच यग्य दत्त याच्या सह एकूण 29 जणांना अटक केली आहे. या साऱ्या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी अतिरीक्‍त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली असून या समितीला येत्या दहा दिवसात आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान आज या अदिवासींची भेट घेण्यासाठी प्रियांका गांधी तेथे निघाल्या असता त्यांना नारायणपुर येथे अडवण्यात आले आणि त्यांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला. तथापी कोणत्या कारणासाठी तुम्ही मला अडवता आहात अशी विचारणा प्रियांका गांधी यांनी करीत त्यांच्याशी हुज्जत घातली.आपण केवळ हत्या झालेल्या अदिवासींच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी तिकडे जात आहोत. तेथे जमाव बंदीचा आदेश असेल तर केवळ चार जणांना बरोबर घेऊन मला तिकडे जाण्याची अनुमती द्या अशी सुचना त्यांनी पोलिसांना केली. पण पोलिसांनी तीही जुमानली नाहीं. त्यावेळी त्या तेथेच धरणे धरून बसल्या.

त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन चुनार येथील गेस्टहाऊसवर नेण्यात आले. त्यांना अटक करण्यात आलेली नाही असा खुलासा उत्तरप्रदेश पोलिसांनी केला आहे. तथापी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी उत्तरप्रदेश सरकारचा निषेध करीत प्रियांकाना बेकायदेशीररित्या अटक केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)