नवी दिल्ली – नवी दिल्ली येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी विजेत्यांना चषक न देऊन शिष्टाचाराचा भंग केला होता. त्यामुळे आयपीएलच्या विजेत्यांना सन्मानित करण्याची माझी इच्छा होती, असे मत प्रशासकीय समितीची सदस्या डायना एडल्जीने व्यक्त केली आहे.
आयपीएल विजेत्यांना चषक देण्याची एडल्जी यांची इच्छा होती. परंतु प्रशासकीय समितीमधील सहसदस्य लेफ्टनंद जनरल रवी थोडगे यांनी ती फेटाळून लावली. अध्यक्षांनीच चषक द्यावा, ही भूमिका त्यांनी घेतल्यामुळे अखेरीस खन्ना यांच्या हस्तेच विजेत्या मुंबई इंडियन्स संघाला चषक देण्यात आला.
यावेळी बोलताना एडल्जी म्हणाल्या की, प्रशासकीय समितीच्या 8 एप्रिलला झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती. दिल्लीत बीसीसीआयच्या द्विराष्ट्रीय मालिकेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रभारी अध्यक्षांनी शिष्टाचाराचा भंग केला. त्यामुळे राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षिसे दिली गेली. त्यामुळेच आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर बक्षिसे प्रशासकीय समितीच्या सदस्यांकडून देण्यात यावी, अशी माझी भूमिका होती.