पावसाळा तोंडावर : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला महापालिकेच्या सूचना
दुबार खर्च टाळण्यासाठी मदतीचेही आश्वासन
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड अधिकाऱ्यांची दांडी
पुणे – पावसाळ्यात खडकी कॅन्टोंन्मेंट बोर्डाकडून काढण्यात आलेली जलपर्णी नदीबाहेर न काढता, तशीच नदीत सोडली जाते. त्यामुळे ही जलपर्णी पुन्हा महापालिका हद्दीत येऊन अडकते. ती काढण्यासाठी पुन्हा खर्च करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन बोर्डाने काढलेली जलपर्णी नदीबाहेर काढावी, ती पुढे ढकलू नये. त्यासाठी मदत हवी असल्यास महापालिका उपलब्ध करून देईल, अशा सूचना बोर्डाच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदीतील जलपर्णी काढण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार ही बैठक बोलविण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, महापालिकेचा वाहन विभाग तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर पुणे कॅन्टोंन्मेंट बोर्डाचा कोणीही अधिकारी न आल्याने त्यांची पुन्हा वेगळी बैठक घेतली जाणार आहे.
महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वीची जलपर्णी काढण्यासाठीची राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया वादग्रस्त ठरली. तसेच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जलपर्णी काढण्याच्या कामाला अद्याप सुरूवात झालेली नाही. त्यातच, ही जबाबदारी नेमक्या कोणत्या विभागाची? यावर प्रशासनात एकवाक्यता होत नसल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्तांनी जलपर्णी काढण्याच्या कामासाठी स्वतंत्र समिती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्तांनी ही बैठक घेतली, त्यात या पूर्वी काढण्यात आलेल्या निविदांच्या मुदत तसेच संबधित ठेकेदारास देण्यात आलेल्या मुदतीत काम करून घेणे शक्य आहे का, याची चाचपणी करण्यात आली. या शिवाय, महापालिकेव्यतिरिक्त कॅन्टोंन्मेंट बोर्डाकडूनही जलपर्णी काढली जाते. मात्र, ती नदीबाहेर काढली जात नाही. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने या दोन्ही विभागांना काढलेली जलपर्णी तशीच नदीत पुढे न सोडता ती बाहेर काढण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच गरज भासल्यास महापालिका मदत देण्यात येईल, असेही सांगण्यात आले. याशिवाय, आचरसंहिता संपताच जलपर्णी काढण्यासाठी तातडीने काय उपाययोजना करता येतील, याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.