धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव

– डॉ. विनोद गोरवाडकर 

‘अणुरणिया थोकडा। तुका आकाशाएवढा’ असं वर्णन करणारे तुकोबा पुण्याजवळच्या देहूगावी वास्तव्यास होते. पुण्याहून बावीस-पंचवीस किलोमीटरवर असणारे देहूगाव आळंदीच्या
निकट आहे. “धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव। तेथे नांदे देव पांडुरंग। धन्य क्षेत्रवासी लोक ते दैवाचे। उच्चारिती वाचे नामघोष।।” असा गौरवपूर्ण उल्लेख तुकोबारायांनी देहूगावच्या संदर्भात केलेला आहे.

पंढरपूर, आळंदी, पैठण या वारकरी संप्रदायातील महत्त्वपूर्ण तीर्थस्थळांसोबत देहू गावचे महात्म्य शब्दातीत आहे. वारकरी संप्रदायात “तुका झालासे कळस’ अशी तुकोबांची महती असल्यानेच ते जगद्‌गुरू पदाला पोहोचले. देहूगाव हे केवळ तुकोबांमुळेच महती पावले आणि ही भूमी पुण्यपावन बनली. तुकोबांच्या विठुरायाविषयीच्या शुद्ध भक्‍तीप्रेमाचा पाझर अनेक वर्षे अखंडपणे वाहात राहिला आणि वारकऱ्यांच्या काळजात जाऊन बसला. भंडारा आणि बामचंद्र या दोन्ही डोंगरांवर तुकोबांनी आपली भक्‍ती साधना केली. एकांतवासात पांडुरंगाचे ध्यान केले आणि तेथेच त्यांना साक्षात्कार झाला. तुकोबा प्रपंचिक असूनही त्यांची पारमार्थिक उंची अद्‌भूत होती. त्यामुळेच “विष्णूमय जग। वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ” अशा प्रकारचे जीवन ते आयुष्यभर जगले. तुकोबांचे वाडवडील विठ्ठलाची उपासना करीत होते. त्यांच्या घरी असणारे विठ्ठल मंदिर तुकोबांनी दुरूस्त केले. छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज, ताराबाईंचे चिरंजीव शिवछत्रपती अशा राज्यकर्त्यांनी देहू क्षेत्राला मदत केल्याचे दाखले आहेत. तुकोबांचे चिरंजीव नारायणबोवा हे देखील खूप मोठे अधिकारी सत्‌पुरुष होते.

तुकोबांनी नामसंकीर्तनाचा सुलभ पारमार्थिक मार्ग प्रापंचिकांना स्वतःच्यामार्गक्रमणातून दाखविला. फाल्गुन व।।2 या तिथीला तुकोबांचे निर्वाण झाले. त्यामुळे द्वितीया ते अष्टमी असा उत्सव नंतरच्या काळात सुरू झाला. तुकारामबीजेला लाखोंचा जनसागर देहूस उसळतो आणि भक्‍तीरांगाच बुक्का प्रत्येकाच्या कपाळी लागतो. तेथील मंदिरात तुकोबांचे वृंदावन आहे. या मंदिराजवळच तुकोबांच्या घराण्यातील काही सत्‌पुरुषांच्या समाध्या बांधण्यात आल्या आहेत. तेथील सिद्धेश्‍वराचे मंदिर सन 1600 च्या पूर्वीचे आहे.

देहूला वाहत असणाऱ्या इंद्रायणीचे महात्म्य इतर ठिकाणांपेक्षा अधिक जास्त आहे. जगद्‌गुरू तुकोबांच्या अभंगांच्या वह्या तथाकथित धर्ममार्तंडांच्या अट्टहासापोटी या नदीने पोत घेतल्या आणि सर्वांना तुकोबांची महती पटावी म्हणून कोरड्याच परत वरती पाठवल्या. त्यामुळे तुकोबारायांचे व्यक्‍तिमत्त्व कमालीच्या भक्‍तीतेजाने तर लखलखलेच पण इंद्रायणीच्या अंतःकरणातील त्यांच्याविषयीचे प्रेमही साऱ्या जगासमोर प्रगट झाले.

यानंतर वारकरी संप्रदायात आणखी एक महत्त्वाचे स्थान आहे, ते म्हणजे त्र्यंबकेश्‍वर, श्री ज्ञानदेवांचे गुरू आमि ज्येष्ठ बंधू श्री निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्‍वरी समाधी घेतली. त्र्यंबकेश्‍वर हे नाशिकजवळ असून बारा ज्योतिलिंगांपैकी एक आहे. या मंदिराजवळ असणाऱ्या ब्रह्मगिरीला या घनगंभीर डोंगराच्या पायथ्याशी अतिशय निसर्गरम्य जागेवर श्री निवृत्तीनाथांचे समाधीस्थान आहे. या स्थानाचे दुसरे एक महात्म्य असे की, या ब्रह्मगिरी पर्वतावर निवृत्तीनाथांचे गुरू श्री गहिनीनाथ यांचीही गुहा आहे. त्र्यंबकेश्‍वरीच पवित्र दक्षिणगंगा म्हणवल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. श्री निवृत्तीनाथांनी ज्येष्ठ व।।12 या तिथीला समाधी घेतली असली तरीही त्यांचा समाधीउत्सव पौष व।।5 या तिथीस प्रारंभ होतो. या उत्सवास खूप लांबून लांबून लोक येतात. यात्रेच्या वेळी श्री निवृत्तीनाथांच्या रथाची मिरवणूक निघते. त्या मिरवणुकीत अनेक दिंड्या सहभागी होतात. आषाढीला श्री निवृत्तीनाथांचीही दिंडी पंढरपुरी येत असते.

तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायणबोवा यांचे समकालीन आणि तुकोबांचे परमशिष्यत्व प्राप्त केलेले श्री निळोबाराय यांचे गाव नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यातील पिंपळनेर हे होय. तुकोबांनी निळोबांना अनुग्रह दिला व संप्रदाय चालविण्याची आज्ञा केली. पिंपळनेरलाही मोठा जनसमुदाय निलोभांच्या पुण्यतिथीला फाल्गुन शु.।।2 या तिथीस जमतो. याशिवाय श्री सोपानकाकांची समाधी असणारे पुण्याजवळील सासवड, मुक्‍ताबाई यांची समाधी असणारे जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद-मुक्‍ताईनगर, श्री सावता महाराजांची समाधी असलेले पंढरपूरजवळील अरण हे गाव, उस्मानाबाद जिल्ह्यातील श्री गोरोबा कुंभार यांची समाधी असलेले तेर गाव, श्री चोखोबा महाराज, श्री दामोजी पंत व श्री कान्होपात्रा या तिन्ही भक्‍तत्रयींचे मंगळ वेढे हे गाव, पैठण येथे राहणारे भक्‍त कुर्मदास यांचे समाधीस्थान असलेले पंढरपूर ते कुर्डूवाडी रेल्वेमार्गावर असणारे “लउळ’ हे गाव, ज्या प्रवरेच्या काठी श्री ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी सांगितली ते नगर जिल्ह्यातील नेवासे गाव ही सारी गावे वारकरी संप्रदायात अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहेत. या क्षेत्रांची यात्रा करणे म्हणजे परमानंदाच्या, मोक्षाच्या, मक्‍तीच्या वाटेवर वाटचाल करणे असेच प्रत्येक वारकरी समजतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)