#CWC19 : भारत- न्यूझीलंड संघात आज उपांत्य सामना

द्रुतगती मारा हेच न्यूझीलंडचे शस्त्र

स्थळ- ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
वेळ-दु.3 वा.

मॅंचेस्टर – विश्वचषक स्पर्धेत सातत्याने भक्कम पाया रचणारी भारतीय संघाची फलंदाजाची पहिली फळी न्यूझीलंडच्या वेगवान व भेदक माऱ्यास कशी सामोरी जाते यावरच त्यांचे उपांत्य फेरीतील लढतीमधील यशापयश अवलंबून आहे. भारताच्या संमिश्र माऱ्यापुढे न्यूझीलंडचे फलंदाज किती टिकतात याचीच उत्सुकता आजच्या सामन्याबाबत निर्माण झाली आहे. या दोन संघांमधील साखळी सामना पावसामुळे रद्द झाला होता. साहजिकच दोन्ही संघांसाठी येथे सत्वपरिक्षाच आहे.

रोहित शर्मा (647), लोकेश राहुल (360), विराट कोहली (442) या पहिल्या फळीतील फलंदाजांनी या स्पर्धेत आतापर्यंत 1347 धावा केल्या आहेत. शर्माने पाच शतके टोलवित विश्‍वविक्रमही नोंदविला आहे. त्याला रोखण्यात येथील अनुभवी गोलंदाजांना अपयश आले आहे. श्रीलंकेविरूद्ध राहुलचे शतक ही संघाचे मनोधैर्य उंचावणारीच कामगिरी झाली आहे. शतकांचा विक्रम करण्यात माहीर असलेल्या कोहलीकडून अद्याप एकही शतक झालेले नाही. चाहत्यांना त्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

पाचव्या क्रमांकापासून भारतास फलंदाजांकडून अपेक्षेइतकी चांगली कामगिरी पाहावयास मिळालेली नाही. चांगली सुरुवात होऊनही शेवटच्या 10 षटकांत धावांचा वेग वाढविण्यात आलेले अपयश हीच भारतासाठी डोकेदुखी आहे. महेंद्रसिंग धोनी याच्या खेळात आक्रमकतेचा अभाव हादेखील चर्चेचा विषय झाला आहे. जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी हे गोलंदाजीत प्रभावी मारा करीत असले तरी अन्य गोलंदाजांना धावा रोखण्यात अपयश आले आहे. केन विल्यमसन व रॉस टेलर यांना ते कसे रोखणार याची उत्कंठा आहे.

विल्यमसन हा न्यूझीलंडसाठी एकांडा शिलेदार आहे. अन्य जोडीदार निराशा करीत असताना एका बाजूने धडाकेबाज खेळ करीत विजयश्री खेचून आणण्यात तो माहीर आहे. भारताचा आधारस्तंभ असलेल्या बुमराह याच्या गोलंदाजीची न्यूझीलंडच्या फलंदाजांना सवय नाही ही त्यांच्यापुढील जटील समस्या आहे. द्रुतगती गोलंदाजांना मिळालेले सातत्यपूर्ण यश हेच त्यांच्या यशाचे गमक ठरले आहे. मिचेल सॅंटनर हा त्यांच्यासाठी हुकमी एक्का आहे. आक्रमक फलंदाजांवर नियंत्रण ठेवण्यात तो अव्वन गोलंदाज मानला जातो.

प्रतिस्पर्धी संघ

भारत – विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, मयंक अग्रवाल, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत.

न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलिन डी ग्रॅंडहोम, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टील, मॅट हेन्री, कॉलिन मुन्रो, जेम्स नीशाम, हेन्री निकोल्स, मिचेल सॅंटनर, इश सोधी, टीम साऊदी.

Leave A Reply

Your email address will not be published.