उत्तर प्रदेशात सपा-बसपाला भाजपची धोबीपछाड

लखनौ – लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशामध्ये भाजपने 2014 सालच्या निवडणुकीमध्ये 80 पैकी 71 जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला होता. तर यंदाच्या निवडणुकीमध्ये सपा-बसपाने भाजपला रोखण्यासाठी एकमेकांना सहाय्य केले. तरिही भाजपने या दोन्ही पक्षांना जबरदस्त प्रत्युत्तर दिल्याचे चित्र आहे. 80 पैकी 61 जागांवर भाजपने विजय मिळवला. सपा-बसपाच्या महागठबंधनने काही ठिकाणी भाजपला चांगली लढत दिली आणि 17 जागा जिंकल्या. मात्र सामूहिक चित्र हे भाजपची सरशी असल्याचेच आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसी मतदारसंघातून तब्बल 3 लाख 70 हजार मताधिक्‍याने विजय मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, महेश शर्मा, सत्यपाल सिंह, व्ही.के.सिंह आणि अनुप्रिया पटेल या अन्य केंद्रीय मंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघांमधून निर्विवाद विजय मिळवला आहे. मात्र मनेका गांधी आणि मनोज सिन्हा या केंद्रीय मंत्र्यांची मतांची आघाडी कमी झाली. त्यामुळे त्यांच्या निकालाबाबत अस्पष्टता आहे. बसपाचे चंद्रभद्र सिंह उर्फ सोनू यांनी मनेका गांधी यांच्यावर अटितटीच्या लढतीमध्ये विजय मिळवला आहे. तर तुरुंगात असलेला माफिया डॉन मुख्तार अन्सारीचा भाऊ आणि बसपा उमेदवार अफजल अन्सारीने मनोज सिन्हा यांना पराभवाचा धक्का दिल्याचे समजले आहे. मात्र या निकलाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भाजपचे युवा नेते वरुण गांधी यांनी यंदा आपल्या मातोश्री मनेका गांधी यांच्या सुल्तानपूर मतदारसंघातून निवडणुक लढवून विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेश राज्य मंत्रिमंडळातील मंत्री रिटा बहुगुणा जोशी यांनीही अलाहबाद मतदारसंघात समाजवादी पार्टीच्या उमेदवारवर विजय मिळवला आहे.

अन्य राज्यांप्रमाणे उत्तर प्रदेशातही कॉंग्रेसच्या कामगिरीचा “पुअर शो’ झाला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गणले जात असलेल्या राहुल गांधी यांनाही भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून अमेठी मतदारसंघामध्ये कडवी झुंज द्यायला लागली. दिवसभराच्या मतमोजणीदरम्यान राहुल गांधी यांना बहुतांश काळ पिछाडीवरच रहावे लागले होते. सरतेशेवटी राहुल गांधी यांचा धक्कादायक पराभव झाला. मात्र रायबरेली या पारंपारिक मतदारसंघातून युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांना अपेक्षेप्रमाणे विजय मिळाला.

कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष राजबब्बर आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांना फतेहपूर सिक्री आणि फारुखाबाद मतदारसंघांमधून पराभवाचा धक्का बसला आहे. कॉंग्रेसपेक्षा सपा-बसपाने भाजपसमोर जे आव्हान उभे केले होते. त्याला भाजपकडून छोबीपछाड दिली गेली. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आझमगडमधून तर त्यांचे वडील मुलायम सिंह यादव यांनी मैनपुरी मतदारसंघातून विजय मिळवला.

दुसरीकडे भाजपने भोजपुरी गायक -अभिनेते दिनेश लाल यादव निरहुआ यांना अखिलेश यादव यांच्याविरोधात मैदानात उतरवले होते. तर आझम खान यांनीही भाजपच्या जया प्रदा यांच्याविरोधात विजय मिळवला. मात्र या अवघ्या काही आपवादात्मक उदाहरणांशिवाय अन्य ठिकाणी भाजपने सपा-बसपाच्या आघाडीला मोठे यश मिळू दिलेले नाही.

मुलायम सिंह यादव यांचे धाकटे बंधू शिवपाल यादव यांनी निवडणुकीच्या तोंडावर स्वतःच नवीन्‌ पक्ष स्थापन केला होता. मात्र मतांच्या बाबतीत त्यांच्या पक्षाचा क्रम सपा-बसपा आघाडीनंतर तिसऱ्या स्थानी लागला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)