कर्नाटकात भाजपची जोरदार मुसंडी

बेंगळूरु – लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे. राज्यातील एकूण 28 जागांपैकी तब्बल 23 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील निकालांपेक्षा ही संख्या 6 जागांनी जास्त आहे. कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाला यंदा केवळ 5 जागांवरच समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत. यामध्येही कॉंग्रेसला 3, धर्मनिरपेक्ष जनता दलाला 1 आणि एका जागेवर अपक्ष उमेदवाराची वर्णी लागण्याचे कल आहेत.

बागलकोट, बेंगळूरु, बेंगळुरु-उत्तर, बेंगळुरु- दक्षिण, बेळ्ळारी, बेळगाव, बिदर, बिजापूर, चिक्काबलापूर, चिकोडी, चित्रदुर्गा, दक्षिण कन्नड, देवांगिरी, धारवाड, गुलबर्गा, हवेरी, कोलार, कोप्पल, म्हैसूर, रायचूर, शिमोगा, तिमूर, उडुपी, चिकमंगळूरु आणि उत्तर कन्नड या सर्व महत्वाच्या मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली आहे.
कर्नाटकात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे.

गेल्या तीन वेळा ते विधानसभेवर व चार वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. पण ही विजयी परंपरा आजच्या पराभवाने मोडीत निघाली आहे. मतदारसंघ बदलून याखेपेस तुमकूरमधून निवडण्याची चूक त्यांच्या हातून घडली. भाजपचे उमेदवार जी.एस. बसवराजू यांनी देवेगौडांचा 24 हजार मतांनी पराभव केला. बसवराजू यांना 4 लाख 20 हजार 843 तर देवेगौडांना 3 लाख 96 हजार मते पडली.

कॉंग्रेसचे खंदे कार्यकर्ते असलेले मल्लिकार्जुन खर्गे आणि विरप्पा मोईली हे आपापल्या मतदारसंघांमध्ये पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. या निवडणुकीच्या निकालांवरच राज्यातील धर्मनिरपेक्ष जनता दल आणि कॉंग्रेस आघाडीच्या सरकारचे भविष्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय समिकरणेही बदलण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)