भुशी डॅम ओव्हर फ्लो

लोणावळा – पर्यटननगरी लोणावळ्यात पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण स्थळ असणारे भुशी धरण सोमवारी (दि.1) सकाळी “ओव्हर फ्लो’ झाले. धरणाच्या भिंतीवरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे आगामी विकेंडला येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. मागील वर्षीही हे धरण 26 जून रोजी भरले होते; यंदा मात्र पावसाने ओढ दिल्याने धरण ओव्हर फ्लो होण्यासाठी 1 जुलै उगवला.

पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना वेध लागतात ते भुशी धरण भरण्याचे. प्रत्येक पावसाळ्यात भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्यावर धरणाच्या भिंतीवरून फेसाळत वाहणाऱ्या पाण्यात डुंबण्याचा आनंद लुटण्यासाठी याठिकाणी पर्यटकांची एक झुंबडच उडत असते. भुशी धरणासोबतच पर्यटकांचे आकर्षण असणारे तुंगार्ली धरण, लोणावळा धरणाच्या पाणी पातळीही सध्या वाढत आहे. मात्र यातही भुशी धरणाबाबत येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये असलेले एक वेगळे आकर्षक याठिकाणी पदोपदी जाणवत असते.

सोमवारी सकाळ अखेर लोणावळ्यात एकूण 627 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून सलग पडत असलेल्या पावसामुळे भुशी धरणाच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत होती. केवळ तो ओव्हर फ्लो केव्हा होतो, हे पाहणे बाकी होते. अखेर सोमवारी सकाळी धरणातील पाणी धरणाच्या सांडव्याला लागल्यावर या सांडव्यावर लावण्यात आलेल्या फळ्या बाजूला करण्यात आल्या आणि धरणातील पाणी फेसळत पायऱ्यांवरून वाहू लागले. याक्षणी त्या ठिकाणी असलेल्या पर्यटकांनी एकच जल्लोष केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)