विजयी वाटचाल टिकविण्यासाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक
स्थळ : द ओव्हल, लंडन
वेळ : दु. 3 वा.
लंडन – धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला गवसलेला सूर ही ऑस्ट्रेलियासाठी आत्मविश्वास उंचावणारी बाजू आहे. दोन सामने पावसामुळे धुतले गेल्यामुळे श्रीलंकेचा संघ त्यांच्याविरूध्द विजय मिळविण्यासाठी चिवट प्रयत्न करील अशी अपेक्षा आहे.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत चार लढतींमधील तीन लढती जिंकल्या आहेत. मात्र, त्यांना भारताकडून पराभवाची चव चाखावयास मिळाली आहे. श्रीलंकेपेक्षा त्यांचे पारडे जड असले तरीही सामन्यास कलाटणी देण्याबाबत श्रीलंकेची ख्याती आहे. हे लक्षात घेतले तर ऑस्ट्रेलियास आज सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे.
वॉर्नर , ऍरोन फिंच, व स्टीव्ह स्मिथ यांचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांनी येथे निराशा केली आहे. मधल्या व शेवटच्या फलंदाजाकडून त्यांना भक्कम कामगिरीची अपेक्षा आहे. श्रीलंका संघात वेगवान व फिरकी गोलंदाजांचा योग्य समतोल साधला गेला आहे. त्यामुळेच त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी डावास आकार देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाची आहे. पाकिस्तानवर मात करण्यात महत्त्वपूर्ण वाटा उचलणारा पॅट कमिन्स, तसेच मिचेल स्टार्क, नॅथन कोल्टर नील यांच्यावर त्यांची भिस्त आहे.
ऍडम झंपा याला फारसे यश मिळत नसल्यामुळे त्याच्या जागी नॅथन लायन याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचे खेळाडू सामन्यास कलाटणी देण्याबाबत चतुरस्त्र खेळाडू मानले जात असल्यामुळेच ऑस्ट्रेलियास येथे विजय मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहेत.
श्रीलंकेला दोन सामन्यांमध्ये पावसाने निराश केले आहे. मधल्या व शेवटच्या फळीतील फलंदाजांचा निराशाजनक खेळ हा त्यांच्यासाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. दिमुथ करूणारत्ने याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या श्रीलंकेला फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे. त्यादृष्टीनेच त्यांना करूणारत्ने याच्याबरोबरच थिसारा परेरा, कुशल परेरा, अँजेलो मॅथ्युज, लहिरू थिरीमाने यांच्याकडून मोठ्या आशा आहेत. सासूचे निधन झाल्यामुळे लसिथ मलिंगा हा मायदेशी गेला होता. तो येथे आज सकाळपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
दुखापतीमधून तंदुरूस्त झालेल्या नुवान प्रदीपवरही लंकेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. गोलंदाजीत इसरू उडाना व मॅथ्युज हे किती प्रभाव दाखवितात यावरही श्रीलंकेचे यशापयश अवलंबून आहे.
प्रतिस्पर्धी संघ :
श्रीलंका – दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), धनंजय डि सिल्व्हा, नुवान प्रदीप, अविष्का फर्नांडो, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल मेंडिस, जीवन मेंडिस, कुशल परेरा, थिसारा परेरा, मिलिंदा सिरीवर्धने, लहिरु थिरिमाने, इसरु उडाना, जेफ्री व्हॅंडरसे.
ऑस्ट्रेलिया – ऍरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, जेसन बेहनड्रॉफ, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), नॅथन कोल्टिअर नील, पॅट कमिन्स, नॅथन लायन, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, ऍडम झम्पा.