बनावट बॅंक खात्याप्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळला
इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांना आज बनावट बॅंक खात्याप्रकरणी अटक करण्यात आली. “नॅशनल अकाउंटॅबिलीटी ब्युरो’ या भ्रष्टाचार विरोधी संस्थेने झरदारी यांना त्यांच्या निवासस्थानी अटक केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाने झरदारी यांना आणि त्यांच्या भगिनी फरयाल तालपूर यांच्या अटकपूर्व जामीनाला मुदतवाढ देण्यास नकार दिला. त्यानंतर “नॅशनल अकाउंटॅबिलीटी ब्युरो’ने रविवारी त्यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावले होते. “एनएबी’च्या पथकाने झरदारी यांच्या घरी जाऊन अटकेची कारवाई केली. झरदारी यांच्या भगिनी फरयाल यांना मात्र अद्याप अटक करण्यत आलेली नाही.
बनावट बॅंक खात्यामध्ये पैसे ठेवणे आणि पाकिस्तानच्या बाहेर पाठवण्याच्या प्रकरणाचा तपास “एनएबी’च्यावतीने केला जात आहे. झरदारी आणि त्यांच्या बहिणीने मिळून या बनावट अकाउंटच्या माध्यमातून 100 कोटी 500 लाख रुपये देशाबाहेर पाठवले असल्याचा “एनएबी’चा दावा आहे. बनावट खात्यांवरून अब्जावधी रुपयांच्या मनी लॉंडरिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या आधारे “नॅशनल अकाउंटॅबिलीटी ब्युरो’ या प्रकरणाचा तपास करत आहे.