सभापतीपदी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची बिनविरोध निवड
दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकारणाला कलाटणी
सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच सभापतीपद मिळवित भाजपने राजकीय खेळी यशस्वी केली आहे. या निवडीने दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकारणाला कलाटणी मिळण्याचे संकेत आहेत.
कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्याने नवीन सभापती निवडीसाठी सोमवारी बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेत सभापतीपदासाठी पालकमंत्री देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जगताप यांनी जाहीर केले. यावेळी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, उपसभापती श्रीशैल नरोळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष व तज्ञ संचालक शहाजी पवार उपस्थित होते.
बाळासाहेब शेळकेंची नाराजी
गेल्या वर्षभरापूर्वी माजी आमदार दिलीप माने यांनी आघाडी करून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या सहकार्याने बाजार समितीच्या निवडणुकीत विजय मिळविला होता. त्यानंतर एक वर्षासाठी सभापतीपदाची धुरा माने यांच्याकडे आली होती. एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर माने यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला. यानंतर सभापतीपदासाठी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके व राष्ट्रवादीचे जितेंद्र साठे यांची नावे चर्चेत होती. यात शेळके यांचे नाव आघाडीवर होते. पण ऐनवेळी पालकमंत्री देशमुख यांच्या नावावर मतैक्य झाले आणि सर्वांनाच अनपेक्षित धक्का बसला. आगामी काळातील बदलत्या राजकारणाचे हे संकेत मानले जात आहेत.
सोमवारी सकाळी सर्व संचालक पालकमंत्री देशमुख यांच्या निवासस्थानी एकत्र जमले. तेथे बैठक झाल्यानंतर दहाच्या सुमारास पालकमंत्र्यांसह सर्व संचालक बाजार समितीकडे रवाना झाले. बाजार समितीच्या सभागृहात आल्यानंतर पालकमंत्री देशमुख यांनी सभापतीपदाचा अर्ज भरला. त्यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जगताप यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली. विजयानंतर बाजार समितीच्या आवारात समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलाल उधळून जल्लोष केला.