पुणे – वास्तूरचनाशास्त्र (आर्किटेक्चर) अभ्यासक्रमासाठीच्या जेईई मेन्स या प्रवेश परीक्षेतील पेपर-2 चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील समीक्षा चंडालिया देशात 23वी आणि महाराष्ट्रात पहिली आल्याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत देण्यात आली.
वास्तूरचनाशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर जेईई मेन परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात आली होती. जानेवारी आणि एप्रिल अशी दोन वेळा ही परीक्षा झाली. त्यात 1 लाख 45 हजार 386 विद्यार्थ्यांनी जानेवारीत झालेली परीक्षा, तर 1 लाख 44 हजार 32 विद्यार्थ्यांनी एप्रिलमधील परीक्षा दिली होती. देशभरातील 373 आणि देशाबाहेरील नऊ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. दोन्ही परीक्षा दिलेल्या 61 हजार 510 विद्यार्थ्यांपैकी 27 हजार 624 विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ झाली. दोन्ही परीक्षांतील गुण विचारात घेऊन पहिले चार क्रमांक पटकावलेले विद्यार्थी आंध्र प्रदेशातील आहेत. त्यात गोल्लापुड्डी लक्ष्मी नारायणने पहिला, कोरापटी निखिल रत्नाने द्वितीय, सिकम रितेश रेड्डीने तृतीय आणि गुड्ला रेड्डीने चौथा क्रमांक मिळवला.