पिंपरी – कुख्यात गुंड बाळू वाघेरे याच्यासह त्याचा साथिदार रामनाथ सोनवणे आणि इतर 3 ते 4 जणांनी मिळून चाकण येथील एका हॉटेल व्यावसायिकाला 25 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी गणेश शांताराम जाधव (वय, 35 रा. नाणेकरवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळू वाघेरे, रामनाथ सोनवणे आणि त्यांच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गणेश यांचे दाजी संदीप पवार यांचे ताथवडे या ठिकाणी ब्ल्यू वॉटर नावाचे हॉटेल आहे.
मंगळवार दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास गणेश हे हॉटेलवर आले होते. या दरम्यान आरोपी बाळू वाघेरे, रामनाथ सोनवणे आणि त्यांच्या साथीदारांनी या हॉटेलवर जाऊन गणेश यांना 25 लाखांच्या खंडणीसाठी धमकावले. तसेच, खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी फोनवरुन आणि रस्त्यात गाडी अडवून देखील धमकावल्याचे तक्रारीत फिर्यादीने नमूद केले आहे.