माढ्यात 31 उमेदवारांमुळे मतमोजणी प्रक्रिया लांबणार : निकालासाठी केवळ सात दिवस बाकी
सातारा – 17 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी आता केवळ सात दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे साहजिकच प्रत्येक मतदाराला आपल्या मतदारसंघाचा निकाल कसा व किती वाजेपर्यंत लागणार याची उत्कंठा लागली आहे. सातारा जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात झालेले मतदान व उमेदवारांची संख्या पाहता सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल दुपारी एक वाजेपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे तर माढा लोकसभा मतदारसंघाच्या निकालासाठी दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी यंदा 11 लाख 9 हजार 434 मतदान झाले आहे. मागील निवडणुकीच्या यंदा मतांची टक्केवारी वाढली आहे. मागील निवडणुकीत तब्बल 22 उमेदवार रिंगणात उतरले होते. तर यंदाच्या निवडणुकीत केवळ 9 उमेदवार रिंगणात आहेत. मागील निवडणुकीचा निकाल साधारण साडेबारा वाजण्याच्या सुमारास हाती आला होता. यंदा उमेदवारांची संख्या निम्म्याने घटली आहे. त्यामुळे दुपारी 1 वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघासाठी दि. 23 मे रोजी औद्योगिक वसाहत, सातारा येथील वखार महामंडळाच्या गोदाम या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. सकाळी ठीक 8 वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी केली जाईल. त्यानंतर ईव्हीएम मशीनच्या मतांची मोजणी करण्यास सुरुवात होईल.
मतांच्या मोजणीसाठी 23 फेऱ्या होणार आहेत. विधानसभा मतदारसंघ निहाय होणाऱ्या मतमोजणीमध्ये सातारा-जावली आणि वाई मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वाधिक 23 फेऱ्या होणार आहेत. पाटण विधानसभा मतदारसंघासाठी 20, कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी 18, कराड-उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी 17 तर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या 16 फेऱ्या होणार आहेत. मतमोजणी एकूण 120 टेबलवर होणार असून त्यासाठी 360 अधिकारी व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहा विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 20 टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक फेरीमध्ये होणाऱ्या मतमोजणीनंतर उमेदवाराला मिळालेल्या मतांची माहिती तात्काळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी फेरीनिहाय उमेदवारांना मिळालेल्या मतांची संख्या लाऊड स्पीकरव्दारे जाहीर करणार आहेत.
दरम्यान, साताऱ्याच्या तुलनेत माढा लोकसभा मतदारसंघात अधिक म्हणजेच तब्बल 31 उमेदवार रिंगणात आहेत. तसेच त्या मतदारसंघात माढा 12 लाख 11 हजार 48 इतके मतदान झाले आहे. उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे त्यामुळे त्या मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर दोन इव्हीएम मशीन उपलब्ध करून द्याव्या लागल्या होत्या. त्याचाच परिणाम मतमोजणीवर दिसून येणार आहे. परिणामी मतमोजणीसाठी साताऱ्याच्या तुलनेत अधिक अवधी लागणार आहे. परिणामी माढाचा निकाल हाती येण्यासाठी किमान दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम अधिकृत निकाल हाती येण्यासाठी साधारण सायंकाळचे पाच वाजण्याची शक्यता आहे.