जियाम (चीन) – आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी भारताचा मल्ल अमित धनखड याने 14 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकाविले आहे. अमित धनखड याला अंतिम फेरीच्या सामन्यात कजाकिस्तानचा मल्ल दैनियार कैसानोव याने 0-5 ने पराभूत केले.
भारताने या स्पर्धेत आतापर्यंत 6 पदक जिंकले आहेत. आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात सुवर्ण, प्रवीण राणाने 79 किलो वजनी गटात रौप्यपदक आणि सत्यव्रत कादियान याने 97 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकाविले होते.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा राष्ट्रकूल सुवर्णपदक विजेता मल्ल राहुल अवारे याने स्पर्धेत 61 किलो वजनी गटात दक्षिण कोरियाच्या किम जिनकोएल याला 9-2 अशा गुणफरकाने हरवत कांस्यपदक प्राप्त केले. तर दिपक पुनिया याने 86 किलो वजनी गटात तजाकिस्तानच्या बखुदूर कोदिरोव याचा 8-2 ने पराभव करत कांस्यपदक पटकाविले आहे.