नीरा कालव्याच्या उपलब्ध पाण्यानुसार कृषी नियोजन  

अजित पवार घेणार आढावा : कृषी अधिकाऱ्यांशी लवकरच बैठक

माळेगाव – नीरा देवघर प्रकल्पातून बारामतीला येणाऱ्या पाण्यासंदर्भात नीरा डावा कालव्याचे आवर्तन 45 दिवसांवरुन दोन महिन्यांवर गेले आहे. या निर्णयामुळे हेच आवर्तन जवळपास चार महिन्यापर्यंत जाण्याची शक्‍यता असल्याने पुढील काळात बारामती परिसरातील शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्यावरच शेतीचे नियोजन करावे लागणार आहे. बारामतीला हक्‍काचे पाणी मिळावे, याकरिता माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा राज्य शासनाकडे पाठपुरावा असताना त्यांच्या मार्गदर्शनानुसार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे विभागीय तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांशी कृषी व्यवस्थेविषयी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.

नीरा देवघर प्रकल्पातून नीरा डावा कालव्याद्वारे बारामती परिसराला देण्यात येणारे पाणी थांबवण्याचा निर्णय झाल्याने बारामती परिसरातील सहकारी साखर कारखान्यासह शेती व अर्थकारणांवर दुरगामी परिणाम होणार आहेत. बारामतीच्या विकासाचे मूळ हे नीरा डावा कालव्याद्वारे मिळणाऱ्या पाण्यात आहे. मात्र, कालपर्यंत या भागात मिळणाऱ्या पाण्यात 4 ते 6 टीएमसी पाणी आवर्तनातून कमी होणार आहे. तसेच, पूर्वी वर्षातील 300 दिवस असणारे पाणी आता 240 दिवसच राहणार आहे. शिवाय रब्बी हंगामातील दोन आवर्तने कमी होणार आहेत.

नीरा डाव्या कालव्यातून बारामतीला येणाऱ्या पाण्यावर बारामती परिसरातील शेतकरी उसासह अन्य नगदी पीके घेऊन अर्थसंपन्न झाला होता. मात्र, सध्या या भागात पाण्याचा तुटवडा निर्माण होणार असल्याने येथील शेतकऱ्यांना आपल्या पिकात बदल करावा लागणार आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार पुढील काळात शेतकऱ्यांना पिके घ्यावी लागणार आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे यापुढील काळात या भागातील अर्थकारणा बरोबरच विकासावर दुरगामी परिणाम होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे विभागीय तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करून तालुक्‍याच्या शेतीविषयी आढावा घेणार आहेत. यासह आगामी काळात उपलब्ध पाणी तसेच शेतकऱ्यांना पिकांबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही याच बैठकीत देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

नीरा डावा कालवा बारामतीसह इंदापूर तालुक्‍यासाठी वरदान ठरला आहे. दीड शतकापूर्वी हा कालवा बांधण्यात आला, त्यामुळे दुष्काळी भागाचे बागायती भागात रुपांतर झाले. बारामती तालुक्‍यातील परिसरातील शेतीला पाणी आल्याने येथील अर्थकारण बदलले. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऊस लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यातूनच साखर कारखाने, शिक्षण संस्था, सहकारी बॅंकांची निर्मिती झाली. तसेच, येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती उपलब्ध झाली. या प्रकल्पातून येणारे पाणी शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांनाही वापरले जात असल्याने संबंधीत गावच्या पाणी योजनाही धोक्‍यात आल्या असून यासंदर्भातही विशेष बैठकीत चर्चा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

बारामती, इंदापूरला आपल्या हक्काचे पाणी मिळणारच आहे. कोणीही आपले पाणी बंद केले किंवा कमी केले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. नीरा देवधर धरण बांधल्यानंतर त्या पाण्याचे त्याचवेळी वाटप करण्यात आले आहे. त्यानुसारच बारामती, इंदापूरला यापुढे नीरा डावा कालव्यातून पाणी मिळणार आहे.
– रंजन तावरे, अध्यक्ष, माळेगाव सहकारी साखर कारखाना

नीरा डाव्या कालव्याशेजारी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याच्या दोन विहिरी आहेत. सध्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असून विहीरी भरत नाहीत. आता, तर कालव्याचे आवर्तन कमी झाले तर विहिरी भरणार नाहीत. गावाच्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्‍न गंभीर होणार आहे.
– डी. जी. माळशिकारे, माजी उपसरपंच, कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायत

सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. या निर्णयाचा उसाला मोठा फटका बसणार आहे. विहिरींचे पाणी आता तळाला गेले असून भविष्यात पिके जगवणे अवघड होणार आहे. हा निर्णय अगदी दुर्दैवीच आहे.
– अशोक निवृत्ती कोकरे, शेतकरी, हनुमानवाडी, पणदरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)