शाळांच्या 865 वर्गखोल्या ‘डेंजर’ झोनमध्ये

दुरुस्तीसाठी 69 कोटी 20 लाख रु. खर्च अपेक्षित : प्रस्ताव “सर्व शिक्षण अभियाना’कडे पाठविला

पुणे – जिल्ह्यातील धोकादायक शाळांच्या केलेल्या सर्वेक्षणानुसार 865 वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. त्याची तत्काळ दुरूती करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी 69 कोटी 20 लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. त्याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून शाळांच्या दुरूस्तीचा प्रस्ताव तयार करून सर्व शिक्षा अभियानाकडे पाठविण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या 3 हजार 675 शाळा आहेत. नारायणपूर येथे शाळेचे छत कोसळून काही विद्यार्थी जखमी झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि शिक्षण विभागाचे सभापती विवेक वळसेपाटील यांनी धोकादायक शाळांची पाहणी करून तत्काळ त्याचा अहवाल तयार करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जिल्ह्यातील बहुतांश शाळांमधील वर्गखोल्यांची स्थिती अंत्यत खराब झाली असून विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अशक्‍य होत आहे. पावसाळ्यात वर्गात बसता येत नसल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना अनेक अडचणी येत होत्या.

दरम्यान, धोकादायक शाळांच्या खोल्यांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यातील किती खोल्या धोकादायक असून त्यांना दुरुस्तीची गरज आहे याची शहानिशा केली. त्यानुसार जिल्ह्यात 865 खोल्यांची स्थिती धोकादायक असल्याने समोर आले.

एका खोलीला 8 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार सुमारे 69 कोटी 20 लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. त्याबाबत केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा निधी मिळेल. त्यानंतर खोल्यांच्या दुरुस्तीला वेग येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी दिली. जिल्ह्यात आंबेगाव, इंदापूर आणि खेड तालुक्‍यात दुरुस्तींच्या खोल्यांची संख्या सर्वाधिक आहे. आंबेगाव तालुक्‍यात 133, खेडमध्ये 113 तर इंदापूर तालुक्‍यात 149 खोल्यांची दुरुस्तीची गरज आहे. पटसंख्येनुसार वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीच्या गरजेनुसार प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे शिक्षण विभागाने
सांगितले.

तालुकानिहाय दुरुस्तीच्या वर्ग खोल्यांची संख्या
आंबेगाव – 133, बारामती – 30, भोर – 47, दौंड – 72, हवेली – 57, इंदापूर – 149, जुन्नर – 38, खेड – 113, मावळ – 41, मुळशी – 23, पुरंदर – 44, शिरुर – 74, वेल्हा – 44.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here