मेगा कंपनीच्या आडमुठेपणाने नागरिक त्रस्त

गोंदवले  – दोन वर्षांपासून सुरू असलेल्या सातारा-पंढपूर मार्गाच्या कामामुळे उन्हाळ्यात धुळीचा तर पावसाळ्यात चिखलाचा त्रास शिंदेवाडी, पिंगळी, गोंदवले, सत्रेवाडी, महिमानगड गावातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी रस्त्याची उंची वाढवून त्या बाजूच्या साईड पट्ट्या व नाले न काढल्याने अनेक घरात पाणी घुसत आहे. मात्र याकडे कोणी लक्ष देत नसल्याने नागरिकांना एकप्रकारे तोंड दाबून बुक्‍क्‍यांचाच मार सहन करावा लागत आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासन संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने संबंधित ठेकेदाराची मुजोरी वाढत चालली आहे.

मंगळवारी रात्री पाऊस झाल्यानंतर पिंगळीनजीक सत्रेवस्तीवर एक लहान मुलगा पाण्यात बुडत असताना शेजारील नागरिकांनी धावत जाऊन त्याला वाचवले. त्यामुळे याठिकाणी मोठी घटना टळली आहे. अन्यथा लहान मुलांचा नाहक जीव गमवावा लागला असता. ही घटना घडताच येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरत हायवे प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन चालू केले होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील, मानव अधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अतुल पवार, मानव अधिकार संघटना जिल्हाध्यक्ष विजय जगदाळे, तसेच पिंगळी मधील ग्रामस्थ यांनी दोन तास रस्त्यावरती ठिय्या मांडला होता.

अनेक वेळा महामार्ग प्रशासन व महसूल विभाग, पोलिस प्रशासनाकडे तक्रारी देऊन देखील या ठिकाणी हायवे लगत असणाऱ्या घरात पाणी शिरत असल्याने या नागरिकांचा रोष वाढला होता.
त्यांनी रस्त्यावरती ठिय्या आंदोलन केल्यानंतर महसूल प्रशासन एका तासात दाखल झाले होते. मात्र यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. संबंधित ठेकेदाराला तहसीलदार यांनी फोन करून तत्काळ कारवाई करून पाणी बाजूने काढून देण्यास सांगितले व काही वेळाने पोलीस व महसूल विभागाच्या मध्यस्थीनंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.