अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर
प्रथम पसंतीक्रमांकाद्वारे 24 हजार 364 विद्यार्थ्यांना प्रवेश
पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे. यात 48 हजार 701 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. प्रथम पसंतीक्रमाद्वारे 24 हजार 364 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. या फेरीच्या कट ऑफची यादी 16 जुलै रोजी जाहीर होणार आहे.
पुणे विभागात एकूण 296 कनिष्ठ महाविद्यालयांनी 1 लाख 4 हजार 139 एवढ्या प्रवेशाच्या जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी एकूण 63 हजार 566 विद्यार्थ्यांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. विद्यार्थी, पालकांना प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा लागली होती. शुक्रवारी (दि.12) ही यादी जाहीर करण्यात आली. संकेतस्थळाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी आपला कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला याची माहिती जाणून घेतली व समाधान व्यक्त केले.
पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना 13 ते 16 जुलै या कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन आवश्यक कागदपत्र सादर करून प्रवेश ऑनलाइन अपलोड करून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर प्रवेश मिळाल्याची प्रिंट विद्यार्थ्यांनी स्वत:कडे ठेवणे आवश्यक आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे बंधनकारकच आहे. या विद्यार्थीनी प्रवेश न घेतल्यास प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीपर्यंत त्यांचा अकरावी प्रवेश अर्जाचा क्रमांक व दहावीच्या बोर्डाचा बैठक क्रमांक ब्लॉक करण्यात येणार आहे. पहिल्या गुणवत्ता यादीचे कट ऑफ व दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध असलेल्या जागांची माहिती 16 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समिती अध्यक्ष मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे.
दुसऱ्या पसंतीक्रमाद्वारे 8 हजार 328, तिसऱ्या पसंतीक्रमाने 4 हजार 923, चौथ्या पसंतीक्रमाने 3 हजार 336, पाचव्या पसंतीक्रमांकाने 2 हजार 474 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. 6 ते 10 या पसंतीक्रमाने 5 हजार 276 विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला आहे.
महाविद्यालयाच्या 2 ते 10 या पैकी पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश मान्य नसल्यास दुसऱ्या गुणवत्ता यादीची वाट पहावी लागणार आहे. या विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश घेण्याची अथवा महाविद्यालयात जाऊन प्रवेश रद्द करण्याची कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही. एकदा प्रवेश घेतल्यानंतर तो काही कारणास्तव रद्द केल्यास त्याबाबतच्या तक्रारींची दखल घेतली जाईल.
कनिष्ठ महाविद्यालयांसाठी सूचना
विद्यार्थ्यांचे प्रवेश नियोजित वेळेत ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक
कागदपत्रे सादर न करणाऱ्यांना परस्पर ऑनलाइन प्रवेश देऊ नयेत
मूळ दाखला, गुणपत्रक ताब्यात घेऊनच प्रवेश निश्चित करावा
प्रवेशाच्या वेळी संपूर्ण फी भरण्याची सक्ती करु नये
विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्राचार्यांवरच राहणार
विद्यार्थ्यांसाठी सूचना
प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी मुदतीत प्रवेश निश्चित करावा
प्रवेशासाठी आवश्यक ती कागदपत्र सादर करणे बंधनकारक
विचारपूर्वक ठरवूनच प्रवेश घेणे आवश्यक
प्रवेश मिळाल्याची प्रिंट घ्यावी
एखाद्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास तो रद्द करता येणार नाही
दोन ते दहा पसंतीक्रमाद्वारे प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या गुणवत्ता यादीची वाट पहावी
पहिल्या यादीतील माहिती
प्रवेशासाठी एकूण प्राप्त अर्ज63,566
प्रवेश दिलेले विद्यार्थी48,701
प्रथम पसंतीक्रमांक विद्यार्थी24,364
प्रवेश न मिळालेले विद्यार्थी14,865