शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील एका कंपनीत कामगार कामावर ठेवायचे असेल व लेबर ठेका चालवायचा असेल तर महिन्याला पाच हजार रुपये खंडणीची मागणी केली. खंडणी दिली नाही म्हणून घरात घुसून महिलेचा विनयभंग केला. तसेच खंडणीखोरांनी घरावर दगडफेक केली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आयटीसी कंपनीमध्ये फिर्यादी व्यक्तीची कंपनीत गाडी खाली करणे व भरण्यासाठी लागणाऱ्या कामगारांना पुरविण्याचा ठेका आहे. त्याच कंपनीत स्वप्नील नागवे याचे काम सुरू आहे, काही दिवसांपूर्वी स्वप्नील व फिर्यादींच्या कामगारांमध्ये वाद झाला होता. त्यांनतर स्वप्नील हा फिर्यादीस वारंवार फोन करून जर तुला कंपनीतील तुझा ठेका चालवायचा असेल तर मला महिन्याला पाच हजार रुपये हप्ता दे, असे म्हणून खंडणी मागत होता.
त्यानतर (दि.2) जून रोजी फिर्यादी घरी असताना स्वप्नील व त्याच्यासोबत चार ते पाच युवक फिर्यादीच्या घरी आले. स्वप्नील खंडणी मागू लागला. त्यावेळी फिर्यादी व स्वप्नील यांच्यात वाद झाला. स्वप्नील व त्याच्या सहकारी युवकांनी फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादीचा भाऊ, मामाचा मुलगा यांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी फिर्यादीची पत्नी मध्ये आली असताना युवकांनी महिलेस मारहाण करीत विनयभंग केला. त्यांनतर सर्वांनी फिर्यादीच्या घरावर दगडफेक केली.
शिक्रापूर पोलिसांनी स्वप्नील नागवे (रा. वाडागाव, ता. शिरूर) तसेच अनोळखी पाच जणांवर खंडणी तसेच विनयभंग, शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट करीत आहेत.