पुणे – खड्डे बुजवण्यासाठी आता केमिकल कॉंक्रिट

पुणे – खड्डे बुजवण्यासाठी केमिकल कॉंक्रिट वापरण्याचा प्रयोग पहिल्यांदाच महापालिकेच्या पथविभागातर्फे केला जाणार आहे. यामुळे पावसाळ्यात देखील खड्डे बुजवणे सोपे जाणार आहे.

पाऊस पडत असताना किंवा रस्ता ओला असताना डांबर-खडीच्या सहाय्याने खड्डे बुजवणे शक्‍य होत नाही. अशावेळी त्याठिकाणी मुरूम टाकले जाते. त्यामुळे खड्डा तात्पुरत्या स्वरूपात बुजला जाऊन त्याठिकाणी पाणी साठत नाही. परंतु सतत त्यावरून वाहने गेल्याने ती खडी सर्वत्र पसरते आणि वाहने घसरून अपघात होण्याची शक्‍यता मोठ्या प्रमाणात असते. हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे.

याच्यावर मात करण्यासाठी महापालिकेने प्रत्येकवेळी वेगवेगळे प्रयोग केले आहेत. पावसाळा सुरू होण्याआधीच खड्डे बुजवण्याचा उपक्रमही महापालिकेने केला आहे. मात्र पहिल्या पावसातच रस्त्यांची दाणादाण उडून रस्त्यांची चाळण होते. खड्डे पडल्यानंतर ते लगेचच बुजवता यावेत, यासाठी या केमिकल कॉंक्रिटचा उपयोग पहिल्यांदाच केला जाणार आहे.
या आधी महापालिकेने प्लॅस्टिकचा वापर करून रस्ते करण्याचा उपक्रमही केला होता. त्याचा परिणाम महापालिकेला चांगल्याप्रकारे मिळाला. मात्र अन्य रस्त्यांवर त्याचा उपयोग त्यानंतर करण्यात आला नाही. खड्डे बुजवतानाही थोडी उघडीप मिळाली तरच ते खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवता येतात. त्याला पर्याय म्हणून केमिकल कॉंक्रिटचा प्रयोग करण्यात येणार आहे.

याशिवाय हॉटमिक्‍स प्लॅन्मधील खडी पावसात भिजू नये म्हणून तेथे 10 हजार चौ. फुटाचा शेड उभारण्यात आला आहे. खडी भिजली, की ती डांबरामध्ये मिसळणे होणे अवघड आहे. तसेच वरच्याबाजूला खडी भिजली तरी आतल्याबाजूला ती ओलीच राहते. त्यामुळे ती लगेचच वापरणे शक्‍य होत नाही. यासाठी हे शेड बांधण्यात आल्याची माहिती महापालिकेतील पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.