अबाऊट टर्न: देशी-परदेशी

हिमांशू

तंत्रज्ञानाचे आभारच मानायला हवेत. माणसाला जे जमत नाही, ते तंत्रज्ञानामुळं साध्य होतं, यावर आमचा विश्‍वास दृढ झालाय. या तंत्रज्ञानामुळंच महाआघाडी नावाची विस्मृतीत गेलेली वस्तू खऱ्या अर्थानं आकार घेऊ लागलीय. निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले तरी महाआघाडी केवळ सत्ताधाऱ्यांच्या भाषणातच दिसत होती.

प्रत्यक्षात महाआघाडीतला प्रत्येक शिलेदार वेगवेगळी खिंड लढवताना दिसत होता. सत्ताधारी म्हणत राहिले, ही “महामिलावट’ आहे आणि यातल्या प्रत्येक पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान बनायचं आहे. त्यामुळं ही महाआघाडी अस्तित्वात येणं शक्‍य नाही. परंतु महाआघाडीतल्या नेत्यांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वी अनेकदा एका व्यासपीठावर येऊन एकी वगैरे दाखवली असली, तरी प्रत्यक्षात निवडणूक प्रचारात महाआघाडी नावाचं फारसं काही दिसलं नाही. आता या पक्षांना एकत्र आणण्याची किमया तंत्रज्ञानानं घडवून आणलीय. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रात काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं सांगण्यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार आणि तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू एकाच मंचावर अवतरले. मतदानाचे तीन टप्पे झाल्यानंतर! वस्तुतः ईव्हीएमला विरोध हा मोदीविरोधी आघाडीचा “कॉमन अजेंडा’ होता. परंतु आपापल्या पक्षाची मोट बांधताना कदाचित या कामासाठी या नेत्यांना वेळ मिळाला नसावा. आता निवडणुकीचं निम्मं कामकाज आटोपलेलं आहे आणि प्रचाराचा ताण कमी झाला आहे म्हटल्यावर चंद्राबाबू थेट मुंबईत आले आणि संयुक्‍त पत्रकार परिषद घेतली.

ईव्हीएम हॅक करता येतं, हा आपला जुना आरोप या मंडळींनी कायम ठेवलाय. यावेळी त्यांनी ते कुठून हॅक केलं जात असावं, याबद्दलही मौलिक माहिती दिली. रशियन हॅकर्स कोट्यवधी रुपयांच्या मोबदल्यात ईव्हीएममध्ये गडबड करण्याचं काम करतात, असा दावा चंद्राबाबूंनी केला. एकेकाळी हैदराबादमध्ये आयटी हब विकसित करणारा हा तंत्रमित्र नेता असल्यामुळं त्यांचं म्हणणं ग्राह्य धरलं जाण्याची शक्‍यता इतर नेत्यांना वाटत असावी. खरं तर निवडणूक आयोगानं ईव्हीएम हॅक होण्याची कोणतीही शक्‍यता नाही, असा निर्वाळा पूर्वीच दिलाय. परंतु मतदानाचे तीन टप्पे झाल्यानंतर पुन्हा ईव्हीएमविरोध सुरू करण्यामुळं वेगळेच प्रश्‍न लोकांच्या मनात आले. त्यावर चर्चाही सुरू झाली. सोशल मीडिया आहेच! मतदानाचा कल लक्षात आला असावा, असा सूर अपेक्षेप्रमाणं लावला गेला. मग ही बाजू शरद पवारांनी सांभाळून घेतली. चंद्राबाबू जसे टेक्‍नोसॅव्ही नेते मानले जातात, तसेच पवार लोकांची अचूक नाडीपरीक्षा नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी सांगितलं की, आम्ही सगळीकडे फिरलो आणि आम्हाला सरकारविरोधी भावना दिसून आली. परंतु ईव्हीएममध्ये फेरफार हा खरा चिंतेचा विषय आहे. अर्थात, ईव्हीएम हॅक करता येतं, अशी “चर्चा’ आहे, हे चंद्राबाबूंचं वाक्‍य अधिक महत्त्वाचं!

परदेशस्थ हॅकर्समुळं निवडणूक धोक्‍यात आल्याचा संशय घेतला जात असताना केरळमध्ये एक “देशी पाहुणा’ थेट व्हीव्हीपॅटमध्येच घुसला. कन्नूर मतदारसंघातल्या एका गावात या यंत्राचा ताबा चक्क एका सापानं घेतला. मतदारानं दिलेलं मत योग्य उमेदवाराला गेलंय की नाही, हे तपासण्याचं काम करणाऱ्या यंत्राची निवड सापानं का केली असेल? कदाचित तीव्र उन्हाळ्यानं हैराण झालेल्या त्या जिवानं त्यात थंडावा शोधला असेल. तंत्रज्ञानात कुणाला काय दिसेल, सांगता येत नाही!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)