लातूर शहरात अचानक दगडफेक ; वाहनांचे नुकसान

लातूर – लातूर शहरातील माताजीनगर परिसरात काही तरूणांनी काल रात्री रॉड, काठ्याने तसेच दगडफेक करून रस्त्याने जाणाऱ्या, येणाऱ्या अनेक वाहनांच्या काचा फोडून सुमारे 50 हजार रूपयांचे नुकसान केले आहे. काल रात्री अचानक काही तरूण आरडाओरड करत रस्त्यावर उतरले. त्यांच्या हातामध्ये काठ्या, रॉड होते. तसेच ते रस्त्यावर पडलेले दगड घेवून रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांवर फेकत होते.

या दरम्यान काही चारचाकी व काही दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मिथून दत्तात्रय गायकवाड रा. जहांगीर आष्टा, ता. उमरगा यांच्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते एका कार्यक्रमानिमित्त आपली क्रुझर घेवून लातूर शहरात आले होते. अन्य वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. माताजीनगर परिसरातील लखन एकुरगे व पांडुरंग एकुरगे यांचे व इरले-पिटले यांच्याशी कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या दोन्ही गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. या दरम्यान एकुरगे बंधूंनी वाहनांवर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या बाबत विवेकानंद चौक पोलिसांनी पांडुरंग एकुरगे यास ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.