तुकोबांच्या पालखीसाठी भामचंद्र प्रासादिक दिंडी सज्ज

सोहळ्याची तयारी पूर्ण : दानशुरांकडून कापडी तंबू, स्वयंपाकाची भांडी, जनरेटर भेट

शिंदे वासुली – श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक 75 भामचंद्र प्रासादिक दिंडीची यंदाची पायी वारीची तयारी पूर्ण झाली आहे. दिंडीतील भाविक वारकऱ्यांसाठी पालखी मुक्‍कामी राहण्यासाठी शिंदे गावचे उद्योजक अण्णा घनवट, माजी अध्यक्ष कांताराम पानमंद आणि द्वारका हॉटेल चालक बाळासाहेब नवरे यांनी 15 हजार रुपयांचा कापडी तंबू देणगी म्हणून दिला.

यावेळी दिंडी प्रमुख हभप संपत राऊत, किसन पिंजण, भास्कर राऊत, प्रकाश पठारे, मारुती गाळव, रामचंद्र दहातोंडे, बबुशा घनवट, महादू मिंडे, गोपाळ दळवी, ज्ञानेश्‍वर जांभुळकर, लक्ष्मण लांडगे आदि दिंडीतील वारकरी उपस्थित होते.

श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर परिसरातील वारकरी संप्रदायातील शिंदे, वासुली, भांबोली, शेलू,आसखेड, कोरेगाव खुर्द येथील भाविक एकत्र येत आषाढी वारीसाठी जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील भामचंद्र प्रासादिक दिंडी क्रमांक 75 म्हणून सहभाग घेतला आहे. या दिंडीच्या माध्यमातून गेले अनेक वर्षांपासून शेकडो भाविक देहू ते पंढरपूर पायी वारी करत विठूरायाच्या दर्शनासाठी लाभ घेतात. यासाठी दिंडी प्रमुख दिंडीतील भाविकांसाठी 15 ते 17 दिवस चहा, नाष्टा, दुपार व संध्याकाळचे जेवण व पालखी मुक्‍कामी राहण्याची उत्तम व्यवस्था करतात. भामचंद्र डोंगर परिसरातील दानशूर भाविकांच्या वतीने यासाठी स्वेच्छेने रोख अथवा वस्तू स्वरुपात देणग्या दिल्या जातात.

चाकणचे उद्योजक सतीश सुदाम शेवकरी यांनी स्वयंपाकाची सर्व भांडी व एक जनरेटर भेट म्हणून देण्यात आले. मंगळवार (दि. 25) पासून भामचंद्र प्रासादिक दिंडी तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात 75 नंबरला सहभागी होऊन पालखीबरोबर सुमारे 17 दिवस पायी प्रवास करुन दि. 11 जुलैला पंढरपुरला पोहोचणार आहे.

दिंडीमध्ये सुमारे 225 ते 250 भाविक सहभागी होतात, असे दिंडी प्रमुख हभप संपत राऊत, किसन पिंजण यांनी सांगितले. दिंडीतील वारकरी पंढरपूरला पोहोचल्यानंतर विठुरायाचे दर्शन घेऊन माघारी फिरतात; परंतु दिंडीतील विणेकरी आणि टाळकरी पंढरपूरला पौर्णिमेचा काला करुनच देहूला परत येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)