हवेलीत खरीप पेरा संकटात

पाणीटंचाईमुळे नागरिकांची दमछाक


प्रशासनाकडून लालफितीचा कारभार

लोणी काळभोर – पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या पदरी अजूनपर्यंत निराशाच आली असून कधी एकदाचा पाऊस पडेल आणि पाणीटंचाई संपून शेतीला पोटभर पाणी मिळेल या आशेवर बळीराजा एक एक दिवस ढकलत आहे. यंदा मॉन्सून वेळेत बरसला नाही तर खरीप हंगामात पेरणीचे संकट घोंगावले आहे. त्यामुळे हवेली तालुक्‍यातील शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडला आहे.

गतवर्षी खडकवासला धरण साखळीतील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस पडला. त्यातच पाणीगळतीमुळे टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग टेमघर धरणात पाणी साठवत नाही. खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणांची एकूण साठवण क्षमता 29.15 टीएमसी आहे. टेमघर धरणात पाणी न साठवल्यामुळे ही क्षमता अजूनच कमी झाली. त्यामुळे पाणीटंचाईला हातभार लागला आहे. खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांत असलेला कमी पाणीसाठा, सरकारी पद्धतीने निवांतपणे चाललेले टेमघर धरण दुरुस्तीचे काम, पुणे महानगरपालिकेने अनिर्बंधरित्या पुणेकरांसाठी वापरलेले पिण्याचे पाणी या कारणांमुळे आज हवेली, दौंड व इंदापूर तालुक्‍यातील 66 हजार हेक्‍टर शेतीला व या तालुक्‍यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

या बाबतीत जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन व राज्य सरकार गंभीर नाही अशी चर्चा तीन तालुक्‍यांत सुरू आहे.
पुणे शहराची लोकसंख्या पंधरा-वीस वर्षापूर्वी खूप कमी होती. त्यावेळी शहराची पिण्याच्या पाण्याची गरज भागून जिल्ह्यातील शेतजमिनीला मुबलक पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यावेळी नवा मुठा उजवा कालवा बारमाही महिने चालू असायचा. नंतर पुणे शहराची लोकसंख्या वाढतच आहे. या लोकसंख्येला साडेपाच टीएमसी पाणी कमी पडू लागले. पालिकेने त्यावेळी जलसंपदा विभागाला सहा टीएमसी पाणी वाढवून द्यावे अशी मागणी केली.

जलसंपदा विभागाने ही मागणी मान्य केली; परंतु वाढवून दिलेले सहा टीएमसी पाण्याच्या बदल्यात पालिकेने सहा टीएमसी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी जुन्या मुठा उजव्या कालव्यामधून शेतीला पुरवावे अशी अट महापालिकेला टाकली.
खडकवासला धरण साखळीतील चारही धरणात अत्यंत कमी प्रमाणात पाणी साठा आहे. त्यामुळे नवा मुठा उजव्या कालव्याचे पाणी गेले दोन महिने बंद आहे. त्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी खालावली आहे. शेतकऱ्यांच्या विहिरी, कूपनलिकांचे पाणी गायब झाले होते. नवा मुठा उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात हवेलीतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले होते. उभ्या पिकांना देण्यासाठी पाणीच उपलब्ध नव्हते. अशा वेळी जुना मुठा उजव्या कालव्याला हे पुणे महानगर पालिकेने सोडलेले अती उच्च (?) दर्जाचे दूषित पाणी आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पाण्याचे स्वागत केले. शेतातील उभे पीक जळून न जाता वाचणार हणून शेतकरी आनंदी झाला.

थोडी खुशी, जादा गम…
पुणे महानगर पालिकेच्या वतीने जुन्या मुठा उजव्या कालव्यामधून शेतीला पाणी पुरवठा करण्यात येतो. एका बाजूला या पाण्यामुळे परिसरातील शेतकरी, वॉटर फिल्टर विकणारे, बाटलीबंद पाणी विकणारे, वैद्यकीय व्यावसायिक, मेडिकल दुकानदार, वेगवेगळ्या प्रकारचे पाईप विकणारे तसेच जेसीबी मालक आनंदित झाले आहेत. दुसऱ्या बाजूला पर्याय नसल्याने हेच घाण पाणी विहिरी व बोअरवेलमध्ये उतरून तेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागल्याने सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेत.

पेरणीचे पोषक वातावरण वाया जाणार?
हवेली तालुक्‍यातील अनेक गावांत शेतकरी मॉन्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. साधारण मृग नक्षत्र आणि खरीप हंगामानुसार 7 जून ते 25 जून हा पेरणीसाठी पोषक आहे. मात्र, मॉन्सूनची संथगती आणि त्यानंतर चार ते पाच दिवस संततधार पाऊस झाल्यानंतर खरीपातील पेरणी उरकणार आहे. मात्र, सध्या मॉन्सूनची वाटचाल पाहता पेरणीसाठी जूनचा शेवटचा महिना उजाडणार आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पहिला पेरा वाया जाणार असल्याची शक्‍यता शेतकऱ्यांतून व्यक्‍त होत आहे. दरवर्षी जून महिन्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. साधारण जुलै महिन्यातच पाऊस बरसत असल्यामुळे हवेली तालुक्‍यात दुबार पेरणीचे सावट घोंगावल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.