जि. प. शाळेच्या भिंतीवरच खासगी शाळेची जाहिरातबाजी

चिंबळीतील प्रकार : पटसंख्या टिकवण्याचे पुन्हा आव्हान

सुनील बटवाल

चिंबळी- जिल्हा परिषद शाळांमधील वाढलेली पटसंख्या कमी करण्याचा चंग सध्या बांधलेला दिसतो आहे. चिंबळी (ता. खेड) येथील एका खासगी इंग्रजी माध्यमिक शाळेने चक्‍क चिंबळी जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारा असलेल्या भिंतीवरच जाहिरीताचा फलक लावला असल्याने जिल्हा परिषद शाळातील पटसंख्या टीकवण्याचे आव्हान पुन्हा शिक्षकांच्या माथी बसणार की काय? अशी भीती व्यक्‍त करण्यात येत आहे.

खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती काही वर्षांपूर्वी दयनीय झाली होती. शाळांची गुणवत्ता दिवसेंदिवस कमी होत होती, याचाच फायदा उचलत खासगी इंग्रजी माध्यमिक शाळांनी उचलला. त्यासाठी त्यांनी आकर्षक जाहिरातबाजी ही केली. याच जाहिरातबाजीला भुलुन अनेक पालकांनी भरघोस डोनेशन भरण्याची तयारी दाखवत पाल्याला खासगी शाळांमध्ये टाकले. यामुळे जिल्हा परिषद शाळांना घरघर लागली होती.

जिल्हा परिषद शाळांमधील गळती थांबवण्यासाठी शासनाने जोरदार पावले उचलली व जिल्हा परिषद शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षणदेण्यासाठी ई-लर्निंग, कृतीयुक्त अध्ययन, सप्तरंगी परिपाठ, सेमी इंग्रजी शाळा यांसारख्या योजना राबविल्या गेल्या. तर अनेक शिक्षकांनी घरोघरी जाऊन या योजनांची माहिती पालकांना पटवून देण्यात यशस्वी ठरले. तसेच या उपक्रमांतून शाळांची गुणवत्ता वाढविण्याबरोबरच शाळांना लागलेली विद्यार्थी गळती कमी करण्यात यशही मिळवले असून अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेतच शिकण्यासाठी पाठवत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद शाळांमध्ये आता अत्याधुनिक पद्धतीने व परिपूर्ण असे शिक्षण मिळत असल्याने अनेक इंग्रजी शाळांचे धाबे दणाणल्याने या संस्थाचालकांना चांगलेच “टेन्शन’ आहे. त्यातच उन्हाळी सुट्टी असल्याने जिल्हा परिषद शाळांना टाळे असल्याची नामी संधी साधत या खासगी इंग्रजी माध्यमिक शाळांनी नवी युक्‍ती शोधून काढली असून ते थेट आता जिल्हा परिषद शाळांच्या प्रवेशद्वार भिंतीवर जाहिरातबाजी करीत खासगी इंग्रजी माध्यमिक शाळांमध्ये कायकाय सोयी-सुविधा आहेत, याबाबताची इथंभूत माहिती देत पालकांना आर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्यांचा हा प्रयत्न जिल्हा परिषद शाळांसाठी धोक्‍याची घंटा मानली जात आहे.

  • सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्याने शाळा बंद आहे. ही संधी साधत संबंधित खासगी इंग्रजी शाळेने ही जाहिरातबाजी केली असणार आहे. तरी संबंधितांना आदेश देऊन तो जाहिरातीचा फलक काढण्यात येईल. तसेच जाहिरातबाजी करणाऱ्या शाळेवर कारवाई केली जाईल.
    – विवेक वळसे पाटील, सभापती, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)