पुणे: बंदी असतानाही गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या एका महिला डॉक्टरला न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा आदेश दिला आहे डॉ. नीना मथराणी असे या महिला डॉक्टरचे नाव आहे. त्यांचे विजय टॉकीजजवळ ललित डायग्नोस्टिक सेंटर नावाचे हॉस्पिटल आहे. या प्रकरणात रानडे हॉस्पिटलचे डॉ. मकरंद रानडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र सुनावणीदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉ. रानडे आणि डॉ. मथराणी हे मिळून गर्भलिंग निदान चाचणी करीत असल्याची माहिती अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे यांना मिळाली होती. त्याबाबत त्यांनी राज्य कुटुंब कल्याण मंडळाला कळवले होते. याचा छडा लावण्यासाठी एका जोडप्याला रुग्णालयात पाठविण्यात आले. डॉ. रानडे यांनी नऊ हजार रुपये घेऊन त्यांना डॉ. मथरानी यांच्या सोनोग्राफी केंद्रात पाठवले. या ठिकाणी कोणताही अर्ज भरून न घेता तपासणी करण्यात आली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर डॉ. रानडेचे रुग्णालय आणि डॉ. मथरानींचे सोनोग्राफी केंद्र सील करण्यात आले होते.
तसेच त्यांचा परवाना जप्त करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज महापालिकेचे वकील आनंद रणदिवे यांनी पाहिले. त्यांनी एकूण चार साक्षीदार तपासले. त्यांना विधी अधिकारी मंजुषा इधाटे त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. मथराणी यांनी कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता सोनोग्राफी केली. संबंधित महिलेकडून एफ फॉर्म भरून घेतला नव्हता, अशी माहिती वकील रणदिवे यांनी न्यायालयात दिली