पोलिसांचे समर्थन ः रोडरोमिओंवर कारवाई योग्यच केल्याचे मत
मांडवगण फराटा -शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा, इनामगाव गणेगाव दुमाला, शिरसगाव काटा, वडगाव रासाई, सादलगाव या गावांनी आज पोलिसांच्या समर्थनार्थ बंद पाळला.
येथील महाविद्यालयीन तरुणाला तरुणीची छेडछाड केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी मांडवगण फराटा पोलीस चौकीमध्ये 11 ऑगस्ट रोजी पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या मारहाणीबाबत सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्याने पोलिसांनी केलेल्या मारहाणीवर प्रश्न उपस्थित केले जात होते.
याबाबत प्रसारमाध्यमांनी बातम्याही प्रसारित केल्या होत्या. यामध्ये मारहाण करणारे पोलीस कर्मचारीच दोषी असल्याचे दाखवले जात होते; परंतु आज या प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण लागले असून पोलिसांनी रोडरोमिओंवर केलेली कामगिरी योग्य असून या प्रकरणात मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदार आबासाहेब जगदाळे यांनी रोडरोमिओंवर केलेल्या कारवाईचे या परिसरातील नागरिकांनी समर्थन केले आहे.
अशा रोडरोमिओंचा निषेध नोंदवत गाव बंद ठेवले होते. पोलीस हवालदार आबा जगदाळे यांच्या समर्थनार्थ मांडवगण फराटा, इनामगाव गणेगाव दुमाला, शिरसगाव काटा, वडगाव रासाई, सादलगाव या गावांनी गाव बंद ठेवून पोलिसांच्या कामगिरीचे समर्थनच केले आहे. यावेळी घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक सुधीर फराटे, श्रीगोंदा साखर कारखान्याचे संचालक श्रीनिवास घाडगे, राजीव फराटे पाटील व ग्रामस्थांनी आपल्या भाषणातून रोडरोमिओंवर केलेल्या कारवाईचे समर्थन केले आहे. मांडवगण फराटा येथे विद्यालय व महाविद्यालये असून वारंवार येथील विद्यार्थींनीना रोडरोमिओ ञास देत असल्याने येथील श्री. वाघेश्वर प्रशालेने पंधरा दिवसांपूर्वी अशा रोडरोमिओंवर कडक कारवाई करण्याचे निवेदन दिले होते. त्याच अनुंषगाने कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. या परिसरातील सर्व गावांत बाजारपेठा दुपारपर्यत बंद ठेवण्यात आल्या होत्या.
इनामगाव येथे निषेध सभा घेण्यात आली. यावेळी येथील मुलींनी आपल्याला रोडरोमिओंचा त्रास होत असल्याची कबुली दिली. येत्या दोन दिवसांत पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन देणार असल्याचे श्रीनिवास घाडगे यांनी सांगितले. या गुन्ह्यात तरुणाला मारहाण करणारे हवालदार आबासाहेब जगदाळे यांची बाजू खरी असून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण सारंगकर, पांडुरंग फराटे, मांडवगणचे सरपंच शिवाजी कदम व ग्रामस्थ उपस्थित होते.
- या प्रकरणात हवालदार आबासाहेब जगदाळे यांची चौकशी सुरु असून कायदेशीर पद्धतीने कार्यवाही केली जाईल. रोडरोमिओंच्या ञासाबाबत पालकांनी सतर्क राहून ताबडतोब तक्रार देणे गरजेचे आहे.
-नारायण सारंगकर, पोलीस निरीक्षक शिरूर