शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल
शिरूर-वडनेर (ता. शिरूर) येथे बैलगाडा शर्यतीवर बंदी असताना बैलगाड्यांची शर्यत करून बैलांना निर्दयपणे मारहाण केल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार आज (रविवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी समीर शिवराम निचीत, समाधान उत्तम राऊत, मोहन सावकार निचित, शहाजी भानुदास निचित (सर्व रा. वडनेर खुर्द, ता. शिरूर) यांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस हवालदार राजेंद्र दगडू गवारे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजेंद्र गवारे यांच्या फिर्यादीवरून त्यांना आज सकाळी सव्वानऊ वाजता मोबाईलवरून फोन आला की वडनेर खुर्द येथे बैलगाडा शर्यत बंद असताना व त्यावर उच्च न्यायालयाची बंदी घातली असताना काही लोकांनी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले. यातील वरील आरोपींनी वडनेर खुर्द गावच्या हद्दीत कुकडी नदीच्या कडेला गुरुनाथ मंदिरासमोर बैलगाडा घाटात बैलांना बैलगाड्या जुंपून त्यांना चढीतिच्या रस्त्याने चढायला लावून, त्यांच्या ताकदीपेक्षा जास्त पळवले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे करीत आहेत.