पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतील आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिकेच्या वतीने धन्वंतरी योजना सुरू करण्यात आली होती. धन्वंतरी योजनेवर गेल्या चार वर्ष तीन महिन्यांत तब्बल 83 कोटींचा खर्च महापालिकेतर्फे करण्यात आला आहे.
महापालिकेच्या वतीने 1 सप्टेंबर 2015 पासून महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी तसेच, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी धन्वंतरी स्वास्थ योजना सुरू केली. त्यात सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरमहा 300 रूपये आणि सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमहा 150 रूपये हप्ता आहे. तर, महापालिका प्रशासन अनुक्रमे 600 व 300 रूपये हिस्सा भरते.
या योजनेस 20 फेब्रुवारी व 19 ऑगस्ट 2014 ला महापालिका सभेने मान्यता दिली. त्यानुसार प्रत्यक्ष लाभ देण्यास 1 सप्टेंबर 2015 ला सुरूवात करण्यात आली. एक सप्टेंबर 2015 ते 31 मार्च 2016 या पहिल्या सहा महिन्यात 11 कोटी 46 लाख 92 हजार 833 इतक्या रक्कमेची एकूण 2 हजार 967 बिले सादर झाली. दुसऱ्या वर्षी 2016-17 मध्ये 20 कोटी 80 लाख 97 हजार 367 रक्कमेची तब्बल 5 हजार 570 बिले प्रशासनाला मिळाली. सन 2017-18 या वर्षांत एकूण 14 कोटी 5 लाख 56 हजार 232 रुपये रक्कमेची बिले मिळाली.
सन 2018-19 या वर्षात 19 कोटी 41 लाख 12 हजार 293 रक्कमेची एकूण 4 हजार 78 बिले मिळाली. एक एप्रिल 2019 ते 31 डिसेंबर 2019 या 9 महिन्यांत 3 हजार 244 बिले मिळाली असून, त्याची रक्कम 17 कोटी 35 लाख 70 हजार 51 आहे. गेल्या सव्वाचार वर्षांत एकूण 83 कोटी 10 लाख 28 हजार 776 रक्कमेचे एकूण 19 हजार 94 बिले प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एकूण 69 कोटी 33 लाख 19 हजार 254 रक्कमेची एकूण 16 हजार 781 बिलांचा खर्च संबंधित रूग्णालयास पालिकेने अदा केली आहेत. अद्याप 13 कोटी 77 लाख 9 हजार 522 रूपयांची एकूण 2 हजार 313 बिलांची रक्कम देणे शिल्लक आहे.