सातारा, दि. 6 (प्रतिनिधी)
शासनाच्या योजनेतून मिळालेल्या कुक्कुटपालन प्रकल्पाच्या पोल्ट्री शेडच्या अनुदानाची फाईल वरिष्ठ कार्यालायात पाठवण्यासाठी दोन हजारांची लाच घेणाऱ्या बरड (ता.फलटण) येथील जनावरांच्या सरकारी दवाखान्यातील डॉक्टरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली. दिलीप महादेव नाझरीकर (सध्या रा. टीसी कॉलेजमागे बारामती, मुळ रा. खटके वस्ती, गोखळी) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. बरड येथील जनावरांच्या सरकारी दवाखान्यामध्ये शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली अधिक माहिती अशी की, बरड परिसरातील एका शेतकऱ्याच्या आईच्या नावाने असलेल्या पोल्ट्री फार्मला शासनाच्या योजनेतून मिळालेल्या शेडच्या अनुदानाची फाईल मंजूरीसाठी वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यासाठी नाझरीकर याने अडीच हजाराची लाच मागणी केली होती.
त्यानंतर तक्रारदरा व नाझरीकर यांच्यात झालेल्या तडजोडीअंती नाझरीकरने दोन हजार रुपये घेण्यास सहमती दाखवल्याने तक्रारदार शेतकऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांच्याकडे तक्रार दाखल केली.
मिळालेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणीची पडताळणी करून शुक्रवारी बरड येथील जनावरांच्या सरकारी दवाखान्यात सापळा लावला.
यावेळी तक्रारदार रशेतकऱ्याकडून दोन हजार रुपयांची लाच स्विकारताना नाझरीकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नाझरीकर याच्याविरोधात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास पोलीस निरीक्षक आरीफा मुल्ला करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक (एसीबी) राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुषमा चव्हाण (एसीबी) उपाधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली संजय अडसूळ, प्रशांत ताटे, संभाजी काकटर, विशाल खरात, तुषार भोसले यांनी केली.