वरिष्ठ सभागृहामध्ये होणार महत्वाची सुनावणी
महाभियोग चालवले जाणारे ठरले तिसरे राष्ट्राध्यक्ष
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृह अर्थात सिनेटमध्ये सुनावणी होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे महाभियोग चालवले जाणणारे ते अमेरिकेचे तिसरे अध्यक्ष ठरले आहेत. अधिकारांचा गैरवापर आणि कॉंग्रेसला अडथळा निर्माण केल्याचा आरोप संसदेच्या प्रतिनिधीगृहाने ट्रम्प यांच्यावर औपचारिकपणे ठेवला आहे. त्यामुळे पुढील वर्षी सिनेटमध्ये ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवला जाणार आहे. त्या सुनावणीनंतर ट्रम्प यांची अध्यक्षपदाची कारकिर्द सुरू राहणार की नाही, हे ठरणार आहे.
बुधवारी रात्री प्रतिनिधीगृहाने ट्रम्प यांच्यावरील आरोपांचे ठराव मंजूर केले. त्यातील अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप 230 विरुद्ध 197 मतांनी तर कॉंग्रेसला अडथळा आणल्याचा आरोप 229 विरुद्ध 198 मतांनी मंजूर झाला.
हा महाभियोग म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातील अत्यंत लाजिरवाणा राजकीय अध्याय असल्याची टीका व्हाईट हाऊसने केली आहे.
प्रतिनिधी सभागृहातील चारही भारतीय-अमेरिकन डेमोक्रॅटिक सदस्यांनी ट्रम्प यांच्या महाभियोगाच्या बाजूने मतदान केले. आता सिनेट या वरिष्ठ सभागृहामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशासमोर सुनावणी होणार आहे.
सिनेटमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच सुनावणी घेतली जाईल, असे सिनेटमधील नेते मिच मॅककॉनेल यांनी सांगितले.
ट्रम्प यांना हटवण्याचा महाभियोग मंजूर व्हावा, यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाला दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असेल.
“जर आम्ही काही कृती केली नाही, तर आमच्या कर्तव्यात कसूर केल्यासारखे होईल. अध्यक्षांच्या बेलगाम कृतीला रोखणे आवश्यकच आहे. त्यांनीच आमच्यापुढे अन्य कोणताही पर्याय ठेवला नाही.’असे डेमोक्रॅटिक नेत्या आणि प्रतिनिधीगृहातील सभापती नॅन्सी पेलोसी यांनी सांगितले.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या निवडणूकीद्वारे आणखी चार वर्षांसाठी अमेरिकेचे अध्यक्ष बनण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. आपल्याविरोधातील महाभियोग म्हणजे आकसापोटी केलेली कृती असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.