काटेवाडी परिसरातील खड्डे बुजविलेच नाहीत
भवानीनगर- बारामती-इंदापूर रस्त्यावरील पिंपळी ते काटेवाडी रस्त्यावर पडलेले खड्डे सार्वजनिक बांधकाम विभाग बारामती विभागाने बुजविले असले तरी काटेवाडी येथील ज्या भागातील रस्ता खऱ्या अर्थाने खराब झाला त्या बसस्थानक परिसरात डांबरीकरण न करता अन्य ठिकाणीच डांबरीकरण करण्यात आल्याने एकीकडे काम अन् दुसरीकडे थांब, असा सरकारी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
बारामती-इंदापूर रस्त्यावर पिंपळी ते बेलवाडी गावापर्यंत मोठ-मोठे खड्डे पडले होते, खड्डे बुजविण्याबाबत गेली कित्येक महिने मागणी करूनही काम केले जात नव्हते. परंतु, या कामाला मुहूर्त लागला.
पिंपळी ते काटेवाडी चार कि.मी. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. ज्याठिकाणी रस्ता खराब झाला तेथे मशीनद्वारे डांबरीकरण करण्यात आल्याने रस्ता चकाचक झाला आहे. परंतु, बसस्थानक ते गतिरोधक या भागात डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यातच काटेवाडी ते सणसर रस्ताही खराब झाला असून भवानीनगर येथील नीरा डाव्या कालव्याच्या उतारावर मोठे खड्डे पडले आहेत. येथील रस्त्याचेही काम करण्यात यावे, अशी मागणी काटेवाडी, भवानीनगर, सणसर तसेच परिसरातील नागरिक व वाहन चालक करीत आहेत. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे डोळेझाक करीत आहे.