…आणि सार्वजनिक शौचालयात दिला तलाक
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 1- सासरच्याविरुद्ध कौटुंबिक छळाची तक्रार दाखल केलेल्या महिलेस तिच्या पतीने सार्वजनिक शौचालयात बेकायदा तलाक दिला. ही घटना लष्कर न्यायालयाच्या परिसरात घडली. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कोंढवा बुद्रुक येथे राहणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेचा 2015 साली विवाह झाला होता. विवाह झाल्यावर आरोपी पती आणि त्याचे आई-वडिल, बहीण व नणंद यांनी घगुती कारणावरून व एटीएम कार्ड परत घेतल्यावरून तिला मारहाण केली होती. तसेच ते तिला सतत त्रास देऊ लागल्याने तिने कोंढवा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या संदर्भातील गुन्ह्याची सुनावणी लष्कर न्यायालयात सुरू आहे. घटनेच्या दिवशी न्यायालयीन कामानिमित्त फिर्यादी महिला तेथे गेली होती. यावेळी ती न्यायालयातील सार्वजनिक शौचालयात गेली असता, तिचा पती व इतरांनी तिला “तू आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चांगले नाही केलेस’, “आम्हाला काही फरक पडत नाही’. तर पतीने “तू काही पण कर माझे दुसरे लग्न ठरले आहे’. “मी दुसरे लग्न करणार आहे’. यामुळे “मी तुला तलाक देत आहे’ असे म्हणत फिर्यादीला बेकायदा तलाक दिला. त्यानंतर तेथून जाताना फिर्यादीला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जी. बी. कुलाळ करत आहेत.