बेलसर -महाराष्ट्रामधील पहिला झिका आजाराचा रुग्ण हा पुणे जिल्ह्यातील बेलसर येथे आढळून आला. आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना यश आले असून त्याचा अहवाल आता निगेटिव्ह आला आहे.
बेलसर येथे व आजूबाजूच्या साधारण नऊ हजार लोकसंख्येमध्ये सर्वेक्षण मोहीम आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनामार्फत गतिमान केली होती. यामध्ये 187 रक्तजलनमुने संकलित करून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये 7 रुग्ण डेंगीसाठी 86 रुग्ण चिकन गुनियासाठी तर एक रुग्ण झिका आजाराने आढळून आलेला होता.
तेथे आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या 15 टीम दोन आठवडे काम करीत होत्या. त्यांना यश आल्याचे दिसून येत आहे. आता बेलसर मधील तापाचे डेंग्यू मलेरिया चिकनगुनियाच्या रुग्ण संख्या तसेच कीटक शास्त्रीय निर्देशांक शून्य आलेले आहेत.
स्वयंसेवक तसेच गावकऱ्यांमार्फतच आजारावर नियंत्रण करण्याचा हा पहिला प्रयत्न करण्यात येत आहे. आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरियाच्या लारवा अळ्या कशा ओळखाव्यात, त्यांचा कालावधी किती दिवसांचा असतो,
हा डास अंडी कोठे घालतो, डेंग्यूचा डास कसा ओळखावा, त्याचबरोबर मच्छर उत्पादित होणाऱ्या जागा नष्ट कशा कराव्यात कोणत्या उपाययोजना राबवण्यात याबद्दल कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामपंचायतीची सर्व टीम सरपंच आणि सर्व सदस्य माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व त्यांचे सर्व विद्यार्थी तसेच अंगणवाडी सेविका व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व स्टाफ यासाठी उपस्थित होता.
कार्यक्रमाचे नियोजन उपसरपंच अर्जुन धेंडे, उपसरपंच धीरज जगताप व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला जाधव यांनी केलेले होते.