पुणे – पुरंदर तालुक्यातील बेलसर आणि आसपासच्या पाच किमी अंतरातील गावात “झिका’चे रुग्ण शोधण्यासाठी आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. आतापर्यंत 180 पैकी 174 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, पाच जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. या तपासणीत 15 जण हे झिका संशयित आढळले होते. त्यांचे देखील अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली.
बेलसरमध्ये झिकाचा रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य कर्मचारी तळ ठोकून होते. तर केंद्राची टीमदेखील बेलसर गावाला भेट देण्यास आली होती. त्यांनी केलेल्या विविध सूचनांनुसार बेलसर परिसरातील पाच किलोमीटरच्या परिसरामध्ये झिका संशयित रुग्णांची कसून तपासणी करण्यात आली.
आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात 9 हजार 506 घरांची तपासणी करून 36 हजार 543 जणांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये पंधरा जण झिकाचे संशयित आढळले होते. या गावामध्ये डास उत्पत्ती होत असलेली जवळपास 116 ठिकाणी आढळली होती. ती नष्ट करण्यात आली आहेत. घरांच्या तपासणीमध्ये 1 हजार 139 कंटनेरमध्ये डासांच्या जिवंत अळ्या सापडल्या होत्या.