सातारा -जिल्ह्यात सोमवारी करोनाचा एकही पॉझिटिव्ह रिपोर्ट आला नाही आणि कराडच्या कृष्णा रुग्णालयातून 15 बाधित रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे कराडसह जिल्ह्याला आज दिलासा मिळाला. जिल्ह्यातील 99 जणांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 145 जणांना विविध ठिकाणच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 119 जण करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यापैकी क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातून 8, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 23 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 4 असे जिल्ह्यातील एकूण 35 रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 82 जणांवर उपचार सुरू आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 3 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 96 अशा एकूण 99 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 16, कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये 66, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात 31, कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात 18 व वाईच्या ग्रामीण रुग्णालयात 14 अशा एकूण 145 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
फलटण -मिरेवाडी येथील करोनाबाधित रुग्ण आजारातून बरा झाल्याने त्याला सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली. फलटणमध्ये आज 483 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत.त्यांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण व्हायचा आहे. विलगीकरणामध्ये 50 व संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 4 व्यक्ती असून .आज 25 चाचण्या घेण्यात आल्या असून त्यांचे अहवाल आलेले नाहीत, आणखी तीन अहवाल प्रलंबित आहेत, असे जगताप यांनी सांगितले.